लुटमारीसह वाहनांची तोडफोड; पाच तरुणांवर दरोड्याचे दोन गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 02:34 PM2021-07-17T14:34:30+5:302021-07-17T14:40:27+5:30
सार्वजनिक रस्त्यावर दांडके व लोखंडी रॉड घेऊन गोंधळ करून समाजात केले दहशतीचे वातावरण निर्माण
पिंपरी : तरुणाला मारहाण करून त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. तसेच एका वाहनातील कार टेप जबरदस्तीने चोरून नेत वाहनांची तोडफोड केली. काळभोरनगर, पिंपरी येथे शुक्रवारी (दि. १६) पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात दरोड्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
सागर सुनील शहा (वय २१, रा. रामनगर, चिंचवड), अविनाश गोपळ हरिजन उर्फ अविनाश टाक (वय २१), मुकेश गणेश प्रसाद (वय २१, दोघेही रा. मोरे वस्ती, चिखली) सागर पोळ आणि किरण वाघमोडे (पूर्ण नाव पत्ते माहिती नाही), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी सागर शहा, अविनाश टाक आणि मुकेश प्रसाद या तिघांना पोलिसांनीअटक केली.
पहिल्या प्रकरणात काशिफ आरिफ खान (वय २७, रा. काळभोर नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १६) फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान मंदिराच्या बाजूला, काळभोर नगर, पिंपरी येथे फिर्यादीचे बॉम्बे सुपारी नावाचे दुकान आहे. या दुकानात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरी करण्याच्या उद्देशाने चोरटे आले असल्याची माहिती खान यांना मिळाली. त्यामुळे ते आपल्या दुकानाकडे चालले असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले. खान यांना जीवे मारण्याची धमकी देऊन लोखंडी रॉडचा धाक दाखवला. त्यानंतर त्यांच्या खिशातून दोन हजार १५० रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर गणेश ऑटोमोबाईल गॅरेज समोरील पार्क केलेल्या गाड्या फोडून सार्वजनिक शांततेचा भंग करत समाजात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दुसऱ्या प्रकरणात राजेश सुधाकर शिरसागर (वय ४०, रा. रस्टन कॉलनी, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. १६) फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे गणेश ऑटोमोबाईल्स नावाचे गॅरेज आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आरोपींनी संगणमत करून आठ गाड्यांच्या काचा फोडल्या तसेच बॉनेटवर दरवाजावर दगड व सिमेंटचे ब्लॉक मारुन नुकसान केले. त्यापैकी एक गाडीमधील १५ हजार रुपयांचा कार टेप जबरदस्तीने हिसकावून नेला. सार्वजनिक रस्त्यावर दांडके व लोखंडी रॉड घेऊन गोंधळ करून समाजात दहशतीचे वातावरण निर्माण केले. पोलीस उपनिरीक्षक रमेश केंगार तपास करीत आहेत.