‘लग्नसराईला नोटाबंदीचे विघ्न’
By admin | Published: December 24, 2016 12:27 AM2016-12-24T00:27:32+5:302016-12-24T00:27:32+5:30
तुळशीचे लग्न झाल्यानंतर प्रामुख्याने लग्नकार्याला सुरुवात होत असून, मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम, कुंकुमतिलक,
कामशेत : तुळशीचे लग्न झाल्यानंतर प्रामुख्याने लग्नकार्याला सुरुवात होत असून, मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम, कुंकुमतिलक, साखरपुडा व लग्न असे विविध कार्यक्रम होतात. लग्नसराईत कामशेत बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. पण शासनाने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाने लग्नकार्य असणारी कुटुंबे व त्याचबरोबर बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. नोटबंदीच्या विळख्यात लग्नसराई अडकल्याने अनेकांची मोठी गोची झाली
आहे.
शासनाने जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करून ४५ दिवस पूर्ण झाले असून, या निर्णयाने अनेक ठिकाणी मोठे परिणाम झाले आहेत. सर्वत्र चलनटंचाई निर्माण होऊन मंदीचे सावट आले आहे. सगळीकडे व्यावहारिक परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच असून, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु झाला असून, अनेकांच्या घरामध्ये लग्नकार्य निघाले असल्याने या कार्यासाठी लागणारा पैसा बँकांमधील खात्यात असूनही काढता येत नसल्याने अनेक वधू-वर पित्याची मोठी गोची झाली आहे. शहरातील बहुतांश बँकांमध्ये पैसे उपलब्ध नाहीत. जेथे पैसे उपलब्ध आहेत तेथे भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. शिवाय एका आठवड्यात २४ हजार रुपयेच काढण्याची मुभा असल्याने लग्नकार्यात लागणारा लाखो रुपयांचा खर्च कसा भागवायचा हा यक्ष प्रश्न अनेकांना पडला आहे. लग्नाची तारीख जवळ येत असल्याने वधू, वर पित्यांची रात्रीची झोप उडाली असल्याचे बोलले जाते. अनेकांनी आपल्या घरातील लग्नकार्ये उभे ढकलली आहेत.
कार्यासाठी येणाऱ्या पै-पाहुण्यांसाठी, तसेच पूजा व इतर धार्मिक विधीसाठी किराणा बाजार भरायचा आहे. पण, पुरेसे पैसे नसल्याने ओळखीच्या व्यापाऱ्यांकडे काही जणांनी उधारीवर बाजार भरला आहे. काहींनी बाजाराचे बिल चेकद्वारे दिले आहे.
याशिवाय देवादिकांचे कार्यक्रम, लग्नाचा बस्ता, मानपानाचे कपडे, नवरा-नवरीसाठी सोन्याचे अलंकार खरेदी, घराची रंगरंगोटी, कार्यालयाचे बुकिंग, घरासमोरील मंडप व्यवस्था, फोटोग्राफर, व्हिडीओ शूटिंग, वधू-वरांचे कपडे, लग्नाचे रुखवत, वरातीसाठी डीजे-बेंजो-रथ-बग्गी, फटाके व आतिषबाजी, केटरिंग, जागरण-गोंधळ, सत्यनारायण पूजा व देवदर्शन आदी नानाविध कार्यक्रमासाठी मोठ्या रकमेची गरज असताना हे पैसे आणायचे कोठून या विचारात वधू-वर पिता पडले आहेत. बँकांमधून पुरेसे पैसे मिळत नाहीत. एटीएम सुविधा विस्कळीत, सावकारी ठप्प, उसनवारीसाठी कोणी तयार नाही. या सर्वांमुळे लग्नकार्य निर्विघ्न कसे पार पडणार याची चिंता वधू-वर कुटुंबांना सतावत आहे.
विवाह कार्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक ग्राहक ‘शेठ पैसे नाहीत, घरात कार्य आहे, बँकांचे व्यवहार सुरळीत झाल्यावर सर्व बिल चुकते करतो’ अशी आर्जव करीत असल्याने उधारीचे व्यवहार वाढले आहेत. (वार्ताहर)