वणव्याने डोंगर झाले ओसाड, वन विभागाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 03:12 AM2018-03-07T03:12:03+5:302018-03-07T03:12:03+5:30
मावळ तालुक्यातील अनेक डोंगर वणवे लागून ओसाड झाले आहेत. मात्र एकही डोंगरावर लागलेला वणवा विझविण्यास वन विभागास जमलेले नाही आणि तसे प्रयत्नही वन विभाग करताना दिसत नसल्याची तक्रार अनेक पर्यावरणप्रेमी करीत आहेत.
कामशेत - मावळ तालुक्यातील अनेक डोंगर वणवे लागून ओसाड झाले आहेत. मात्र एकही डोंगरावर लागलेला वणवा विझविण्यास वन विभागास जमलेले नाही आणि तसे प्रयत्नही वन विभाग करताना दिसत नसल्याची तक्रार अनेक पर्यावरणप्रेमी करीत आहेत.
मावळ तालुक्यात नाणे, पवन, आंदर मावळासह अनेक भाग मागील काही वर्षांपूर्वी घनदाट जंगले, वनराई व नैसर्गिक साधनसामग्रीने स्वयंपूर्ण होता. मात्र, बेसुमार वृक्षतोड, जाणीवपूर्वक लावलेले वनवे, डोंगरांवर होणारे उत्खनन आदी कारणांमुळे मावळ तालुका हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला तालुका म्हणून ओळख असताना ती कालांतराने हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी धो धो पडणारा पाऊसही आता मोजूनमापून पडत आहे. मावळातील विविध भागांत जाताना गर्द झाडी असायची. आता मात्र सावली मिळण्यासाठी एखादे झाडही मिळणे मुश्कील झाले आहे. याची कारणे शोधण्यात व त्यावर उपाययोजना करण्यात प्रशासनाला वेळ नसला, तरी काही वर्षांपासून अनेक पर्यावरणप्रेमी संघटना वृक्षारोपणापासून ते त्यांच्या संवर्धनापर्यंत जबाबदारी उचलताना अनेक ठिकाणी दिसत आहेत.
वन विभागाचे अधिकारी फक्त कागदोपत्री काम करीत असल्याने मावळातील वणवेही केवळ कागदांवर शिल्लक राहिले आहेत.
मावळातील वनक्षेत्राची दोन विभागांत विभागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये वडगाव विभागांतर्गत साधारण १० हजार ६६ हेक्टर वनक्षेत्र आहे. यात १२९ गावांचा समावेश आहे. हे वनक्षेत्र सांभाळण्यासाठी एक वनक्षेत्रपाल, १३ वनरक्षक, ३ वनपाल, तर १८ वनमजूर काम करतात. शिरोता विभागात साधारण १२ हजार ६१३ हेक्टर वनक्षेत्र असून, त्याकडे लक्ष देण्यासाठी एक वनक्षेत्रपाल, १४ वनरक्षक, ३ वनपाल व १५ वनमजूर कार्यरत आहेत. एवढे लोक कार्यरत असतानादेखील मावळात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी व वनाचे रक्षण करण्यासाठी नेमलेल्या वनरक्षकांचे खिसे गरम करून, शिवाय वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांना मेजवानी देऊन त्यांची मर्जी सांभाळल्यास तुम्ही काहीही करू शकता, असे काही वन्य प्राणिप्रेमी व पर्यावरणवादी नागरिक उपहासाने म्हणत आहेत.
मागील वर्षी मावळात एक लाख वीस हजार झाडे लावण्यात आली; पण त्यातील किती झाडे जगली याविषयी कोणतीच माहिती उपलब्ध नसावी. कारण शासनाने केवळ वृक्षलागवड केली. मात्र त्यांच्या संगोपनाची काळजी घेतली नाही व या वर्षी साधारणत: साडेतीन ते चार लाख झाडे लावण्यात येणार आहेत. पण त्यांच्याही संगोपनाचे नियोजन केलेले नसल्याने शासन वृक्ष लागवडीसाठी करीत असलेला खर्च हा व्यर्थ जात आहे. वणव्यांमुळे जैवविविधता नष्ट होते हे सांगणाºया वन विभागाचा ढिसाळ कारभारच यासाठी जबाबदार आहे. अपुरी व अद्ययावत नसलेली साधनसामग्री, कामाच्या बाबतीत उदासीनता, त्याचप्रमाणे स्थानिकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन आदी कारणे काही पर्यावरणप्रेमी सांगतात.