वऱ्हाड निघालंय बेळगावला!
By admin | Published: February 4, 2015 01:09 AM2015-02-04T01:09:31+5:302015-02-04T01:09:31+5:30
बेळगाव मुक्कामी ६ ते ८ फेब्रुवारीला होणारे ९५ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी नाट्यरसिकांचे वऱ्हाड बेळगावला निघण्यास सज्ज झाले आहे.
राज चिंचणकर- मुंबई
बेळगाव मुक्कामी ६ ते ८ फेब्रुवारीला होणारे ९५ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी नाट्यरसिकांचे वऱ्हाड बेळगावला निघण्यास सज्ज झाले आहे. तीन दिवस रंगणाऱ्या या संमेलनात संगीत, नृत्य, नाट्य, एकपात्री, एकांकिका आदी कार्यक्र मांची रेलचेल आहे.
संमेलनस्थळी उभारण्यात येणाऱ्या मुख्य रंगमंचाला स्मिता तळवलकर रंगमंच, लोकमान्य रंगमंचाला सदाशिव अमरापूरकर रंगमंच, तसेच जिरगे नाट्यगृहातील रंगमंचाला कुलदीप पवार रंगमंच व नयनतारा रंगमंच अशा नावांनी ओळखण्यात येणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीतील मुख्य प्रवेशद्वाराला दौलतराव मुंतकेकर आणि बाप्पा शिरवईकर यांची नावे देण्यात येणार आहेत.
नाट्यसंमेलनाचे उद्घाटन ७ फेब्रुवारीला होत असले, तरी ४ तारखेपासून संमेलनाचे पूर्वरंग सादर होणार आहे. यात प्रामुख्याने स्थानिक कलावंतांचे कार्यक्र म होणार आहेत. ६ तारखेच्या पूर्वसंध्येला सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात गद्य व संगीत नाटक, आरती अंकलीकर यांचे गायन सादर होणार आहे. नाट्यसंमेलनाबाबत स्थानिक पातळीवर जनजागृती होण्याच्या दृष्टीने नाट्य परिषदेची मध्यवर्ती शाखा हा महोत्सव आयोजित करणार आहे. त्यानंतर संमेलनाची सूत्रे नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेकडे देण्यात येणार आहेत.
७ तारखेला उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष फैय्याज यांची प्रकट मुलाखत होणार आहे. तसेच नाट्य परिषदेच्या विविध शाखा व इतर नाट्यसंस्थांचा एकांकिका महोत्सव हे या दिवसाचे आकर्षण आहे. त्याचबरोबर एकपात्री महोत्सवही या दिवशी रंगणार आहे.
संगीत व नृत्याच्या कार्यक्रमांसह ‘विच्छा माझी पुरी करा’ आणि ‘आयदान’ ही नाटके या दिवशी सादर होणार आहे. ८ तारखेला बालनाट्य महोत्सव, तसेच ‘ग्रॅण्ड फिनाले’ हे नाटक होणार आहे. याच दिवशी संध्याकाळी नाट्य संमेलनाचा समारोप सोहळा होणार असून, या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले असल्याचे नाट्य परिषदेने स्पष्ट केले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी, हे नाट्यसंमेलन नक्की यशस्वी करू, असा विश्वास व्यक्त केला असून, या संमेलनाला ३० ते ४० हजार लोक उपस्थित असतील, अशी आशाही व्यक्त केली आहे. बेळगावमधल्या विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांनी हे नाट्यसंमेलन उचलून धरले असून, हे नाट्यसंमेलन यशस्वी होईल, अशी भूमिका नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी संमेलनाबाबत बोलताना मांडली आहे.
नाट्यसंमेलनस्थळी उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीत संमेलनाचा मुख्य उद्घाटन सोहळा ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता रंगणार आहे. संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या वेळी मावळते नाट्य संमेलनाध्यक्ष अरु ण काकडे हे नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष फैय्याज यांच्याकडे या पदाची सूत्रे सोपवणार आहेत.