भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी पिंपरीत उद्या विविध संघटना करणार अन्नत्याग आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 12:09 PM2020-12-07T12:09:13+5:302020-12-07T12:10:31+5:30
शेतकरी व कामगार विरोधी कायदे करून केंद्र सरकारने अन्याय केला आहे.
पिंपरी : नवीन कृषी विधेयक व कामगार कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांकडून दिल्ली येथे आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी भारत बंद पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरीत मंगळवारी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच शहरवासीयांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विविध संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा कामगार संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष डाॅ. कैलास कदम, स्वराज अभियानचे मानव कांबळे, माजी आमदार गाैतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, आयटकचे अनिल रोहम, शेतकरी कामगार पक्षाचे नितीन बनसोडे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे गिरीश वाघमारे, प्रहार संघटनेचे संजय गायखे, रिक्षा पंचायतचे अशोक मिर्गे, समाजवादी पार्टीचे रफीक कुरेशी, प्रा. नरेंद्र पवार, डीवायएफआयचे सचिन देसाई, सीपीएमचे गणेश दराडे, श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, काॅंग्रेसचे शाम आगरवाल, शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती देसले, छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, शिवशाही व्यापारी संघाचे युवराज दाखले, भारतीय लहुजी पॅंथरचे संदीपान झोंबाडे, बाराबलुतेदार महासंघाचे विशाल जाधव, हाॅकर्स संघटनेचे काशिनाथ नखाते आदी या वेळी उपस्थित होते.
कैलास कदम म्हणाले, शेतकरी व कामगार विरोधी कायदे करून केंद्र सरकारने अन्याय केला आहे. त्याविरोधात देशातील शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पिंपरी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात आंदोलन केले जाईल. सकाळी दहाला विविध संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. व्यापारी व व्यावसायिकांसह शहरवासीयांनी आंदोलनात सहभागी व्हावे.