महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे वेदांत प्रकल्प गुजरातला गेला; गिरीश महाजन यांचा आरोप
By नारायण बडगुजर | Published: September 22, 2022 04:30 PM2022-09-22T16:30:27+5:302022-09-22T16:31:04+5:30
टीका न करता महाविकास आघाडीने आत्मपरीक्षण करावे
पिंपरी : वायनरी, दारूवरील टॅक्स कमी करण्यासाठी आग्रही असणाऱ्या महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे वेदांत प्रकल्प बाहेर गेल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना वेदांत प्रकल्पबाबत बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
केंद्र सरकारच्या ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ व हरीत जलसमृद्ध गाव याविषयावरील कार्यशाळेच्या निमित्ताने महाजन आले होते. पत्रकारांशी संवाद साधला. महाजन म्हणाले, ‘‘वेदांत आमच्या काळात नाही गेली. पाच जानेवारीला सरकारला पत्र दिले होते. सहा महिने काहीही केले नाही. बैठकही घेतली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला टीकेचा अधिकार नाही. याबाबत महाविकास आघाडीने टीका न करता आत्मपरिक्षण करावे.’’
अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याचा परिणाम
महाजन म्हणाले, ‘‘अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांनी कोणाला वेळ दिला. घरातून बाहेर पडले नाहीत. मंत्रालयाची पायरी चढले नाहीत. आमदार, खासदारांशी संवाद साधला नाही. उदासिनता हेती. केवळ प्रक्षोभक भाषणे केली. सहा महिने महाविकास आघाडीने प्रतिसाद न दिल्याने हा प्रकल्प बाहेर गेला आहे.’’
शिवसेनेची शेवटची धडपड
महिनाभरात निवडणूक लागली तर कळेल, असे आव्हान भाजपाचे नेते अमित शहा यांना आव्हान देणारे उद्धव ठाकरे आत्याबाईला मिशा असत्या तर म्हणी प्रमाणे वागत आहेत, अशी टिपन्नी करून महाजन म्हणाले, ‘‘ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील निकालात ठाकरे यांचा पक्ष शेवटी आहे. याबाबत आत्मपरिक्षण करावे. आपल्या कार्यकाळात ठाकरे यांनी काहीही भरीव कामं केलं नाही. आता मात्र ते शेवटची धडपड करतायत. आत्मपरिक्षण करून संयम ठेवावा. दसरा मेळाव्यालाही त्यांनी दुसरं मैदान बघाव लागतेय. जलयुक्त शिवार योजनेत कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही उलट आम्हाला क्लीनंचिट मिळाली आणि तुला योजनेचा गावांनाही फायदा झाला आहे.’’