पालेभाज्या महागल्या, फळांचे भाव स्थिर; परतीचा पाऊस न पडल्याने शेतकरी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 03:00 AM2018-10-29T03:00:50+5:302018-10-29T03:01:09+5:30
लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी काही भाज्यांचे दर वाढले होते, तर काही भाज्यांचे भाव मागील आठवड्याप्रमाणे स्थिर होते.
पिंपरी : येथील लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी काही भाज्यांचे दर वाढले होते, तर काही भाज्यांचे भाव मागील आठवड्याप्रमाणे स्थिर होते. महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. परतीच्या पावसाकडून शेतकरी वर्गाला मोठी अपेक्षा होती. मात्र जिल्ह्यातील अनेक भागामध्ये परतीच्या पावसाने तोंडही दाखवले नसल्याने उत्पादनात घट झाली आहे. परिणामी बाजारामध्ये होणारी भाज्यांची आवक घटली आहे. टोमॅटोची आवक वाढल्याने त्याचे भाव कमी आहेत. टोमॅटो ८ ते ९ रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. वाटाण्याचे भाव १२० ते १३० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर मिरचीने पन्नाशी गाठली आहे. गवार, भेंडी, वांगी यांची प्रत्येकी ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. राज्याच्या अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. गुलटेकटी व मोशी येथील भाजी मंडईमध्ये आसपासच्या जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणावर भाज्यांची आवक होते. तेथून पिंपरीतील मंडईमध्ये भाज्यांची आवक होते. मात्र पाऊस पडला नसल्यामुळे आवक घटली आहे. त्याचा परिणाम भावावर होऊन भाज्यांचे भाव वाढले आहे. मेथी १५ ते २० रुपयाने विकली जात होती.
फळबाजारांमध्ये फळांची आवक वाढली आहे. पेरू, पपई व सीताफळ यांची आवक वाढली आहे. आवक वाढली असली, तरी दिवाळीच्या इतर खरेदीमुळे ग्राहकांनी फळबाजाराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे भाव मागील आठवड्यात जसे होते तसेच आहे. सीताफळ तीन प्रकारांत उपलब्ध असून ६०, ८० व १०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. अंजीराचा हंगाम सुरू झाल्याने बाजारामध्ये अंजीर दाखल झाले आहे. १२० ते १८० रु. प्रतिकिलो दराने विक्री सुरू आहे.
फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो) पुढीलप्रमाणे
बटाटे : २० ते २२, कांदे : २० ते २२, टोमॅटो : ०८ ते १०, गवार : ५० ते ६०, दोडका : ४०, घोसाळी : ४०, लसूण : ६०, आले : ४०, भेंडी : ४० ते ५०, वांगी : ५० ते ६०, कोबी : २०, फ्लॉवर : २५ ते ३०, शेवगा : ६० ते ७०, हिरवी मिरची : ५०, सिमला मिरची : २५ ते ३०, पडवळ : २०, दुधी भोपळा : २५ ते ३०, लाल भोपळा : २०, काकडी : २०, चवळी : ३५ ते ४०, काळा घेवडा : ७० , तोंडली : ४०, गाजर : ३०, वाल : २५ ते ३०, राजमा : ४० ते ५०, मटार : १२० ते १३०, कारली : ४० ते ५०, पावटा : ५०, श्रावणी घेवडा : ४० ते ५० , लिंबू : ४० ते ५० (शेकडा)
पालेभाज्यांचे भाव : कोथिंबीर : १० ते १५, मेथी : १५ ते २०, शेपू : १५ ते २०, पालक : ८ ते १० , मुळा : २० , कांदापात : १५, तांदुळजा : १०, पुदिना : ५.
फळांचे भाव : सफरचंद : १००, पेरू : ६०, सीताफळ : ६०, ८०, १००, पपई : ५०, डाळिंब : १००, मोसंबी : ६०, संत्री : ८० ते १०० (परदेशी), किवी : १०० (४ नग), ड्रॅगन फ्रुट : ८० ते १००, पिअर : १६०, १८०(परदेशी).