ट्रॅफिक वॉर्डनच करतात वाहनांची तपासणी
By admin | Published: May 3, 2017 02:24 AM2017-05-03T02:24:15+5:302017-05-03T02:24:15+5:30
सध्या शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला रहदारी वॉर्डन नेमण्यात आले आहेत
रहाटणी : सध्या शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीला रहदारी वॉर्डन नेमण्यात आले आहेत. मात्र, सध्या रहदारी वॉर्डनचा उपयोग वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा इतर कामांसाठी होत आसल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. सिग्नलवर उभे असलेल्या वाहनचालकांचा परवाना तपासणे, पीयूसी तपासणे, वेळप्रसंगी दंडाची पावती फाडणे इतकी कामे सर्रास रहदारी वॉर्डन करताना दिसून येत आहेत. मात्र, या सर्व प्रकारात शहरातील चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
जर ही सर्वच कामे वॉर्डन करीत असतील तर पोलिसांचे कामच काय? असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत. मागील काही दिवसांपासून कोकणे चौकात वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा वाहने आडवून या ना त्या कारणाने दंडाची पावती फाडत वाहनचालकांना वेठीस धरले जात आहे.
काही दिवसांपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर सर्रास दंडात्मक कारवाई करताना वाहतूक पोलिस दिसून येत आहेत. अनेकवेळा एखादा वाहनचालक सिग्नलला उभा असेल तर त्याला बाजूला घेऊन त्याच्याकडे परवाना, पीयूसी यासह इतर कागदपत्रांची तपासणी केली जाते.
मात्र, ही तपासणी वाहतूक पोलीस करीत नाही तर रहदारी वॉर्डन करत असल्याचा आरोप अनेक वहानचालक करीत आहेत. काहीवेळा तर चालत्या वाहनाला अडविण्याचा प्रकार केला जातो. त्यामुळे एखादा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल वाहनचालक विचारत आहेत.
रहाटणी येथील कोकणे चौक, शिवार चौक, साई चौकात हा प्रकार नित्याचाच झाला आहे. या चौकात वहातूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यापेक्षा वाहने आडविण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. रहदारी वॉर्डन वाहनाची तपासणी करून त्या संबंधित वाहनचालकांना पोलिसाकडे पाठवितो. नेहमी या चौकात तीन-चार पोलीस व दोन-तीन रहदारी वॉर्डन असतात. अनेक वेळा हे सर्व जण शिवार चौकाकडून औंधकडे वळणाच्या कडेला उभे असतात. त्यामुळे वाहन वळविताना वाहनचालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. तपासणीसाठी आडविलेली वाहने रस्त्याच्या मधोमध उभी आसतात. त्यामुळे इतर वाहनांना रस्ताच मिळत नाही. पोलिसांना काही बोलले तर लगेच वाहन बाजूला घेण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे वहतूक पोलीस नेमके कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.
हीच परिस्थिती कोकणे चौकात निदर्शनास येते. कोकणे चौकातून नाशिक फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर अगदी वळणावर वाहतूक पोलीस व रहदारी वॉर्डन अगदी धबा धरून बसल्या सारखे उभे असतात. एखादे वाहन आले की लगेच त्याला अडविले जाते.
सीट बेल्ट लावला नाही, काळ्या काचा यांसह अनेक कारण सांगत वाहन अडविले जाते. वाहनचालक व पोलिसांमध्ये बाचाबाची प्रकारही नित्याचेच झाले आहेत. कारवाई करायचीच तर सर्वांवर करा, असे वाहनचालक म्हणतात़ अनेक वाहन चालक दंड प्रकरण चिरीमिरीवर मिटण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे ही कारवाई म्हणावी की, दिवसाचा खर्च वसूल असाच प्रश्न अनेकांना सतावत आहे.
अशा कामचुकारपणा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर व कोणत्याही प्रकारचे अधिकार नसताना वाहन तपासणी करणे, वेळप्रसंगी दंडाच्या पावत्या फाडणाऱ्या वॉर्डनवर संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होईल काय? असा सवाल वाहनचालकांना सतावत आहे. (वार्ताहर)
पोलिसांपेक्षा वॉर्डनचीच आरेरावी जास्त
वाहतूक पोलीस फक्त चौकाच्या एका कोपऱ्यात उभे राहून दंडाची पावती फाडण्याचे काम करीत असतात. मात्र, रहदारी वॉर्डन वाहन आडवीने, वहान चालविण्याचा परवाना, पीयूसी यांसह इतर कागदपत्रांची तपासणी करणे, वाहन पोलिसांच्या ताब्यात देणे ही मुख्य भूमिका वॉर्डन पार पाडताना दिसून येत आहेत. एखादा वाहनचालक मागितलेले कागदपत्र देण्यास टाळाटाळ करत असेल किंवा तुला काय अधिकार आशी विचारणा केल्यास काही वेळा तर वाहनाची चावी काढून घेतली जाते. त्या वाहन चालकाशी वॉर्डन हुज्जत घालतात, असे प्रकार नित्याचे झाले आहेत. एखाद्या वाहनाला किती दंड आकारायचा तेसुद्धा रहदारी वॉर्डनच ठरवित आहेत.