पिंपरी चिंचवडमधील गुजरनगर येथे वाहनांची तोडफोड; डिझेलही गेले चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 04:23 PM2018-01-29T16:23:41+5:302018-01-29T16:25:23+5:30
वाहन तोडफोडीचे सत्र पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप थांबलेले नाही. रविवारी रात्री १ च्या दरम्यान थेरगावमधील गुजरनगर परिसरात अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर पार्क केलेल्या पाच-सहा गाड्यांची तोडफोड केली व पसार झाले.
थेरगाव : वाहन तोडफोडीचे सत्र पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप थांबलेले नाही. रविवारी रात्री १ च्या दरम्यान थेरगावमधील गुजरनगर परिसरात अज्ञात व्यक्तींनी रस्त्यावर पार्क केलेल्या पाच-सहा गाड्यांची तोडफोड केली व पसार झाले. तसेच फोडलेल्या गाड्यांचे कित्येक लिटर डिझेलही चोरीला गेले आहे.
गुजरनगर परिसरात रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी परिसरात रस्त्यावर पार्क केलेल्या पाच-सहा वाहनांची तोडफोड केली. या अज्ञातांनी दहशत निर्माण करण्यासाठी किंवा कसला राग काढण्यासाठी लाठ्या आणि दगडांच्या साह्याने वाहनांची तोडफोड केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच परिसरात मोकळ्या मैदानावर रात्री काही मद्यपी बसलेले असतात. त्यांनी हे कृत्य केले असावे, अशीही शक्यता स्थानिकांनी व्यक्त करीत आहेत. तोडफोड झालेल्या वाहनांमध्ये इनोव्हा, टेम्पो ट्रॅव्हलर, बस, कार या वाहनांच्या काचा फोडल्या असून यामध्ये गाड्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या महिन्याभरात वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. थेरगाव गावठाण, घरकुल परिसर, चिंचवडगाव, नेहरूनगर, संतनगर-भोसरी, साने चौक, सांगवी परिसरात यापूर्वी वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा वाहन तोडफोडीच्या घटना रोखण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत व परिसरातील पोलिसांचा वाचक कमी झाला आहे असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये तोडफोडीच्या काही घटना घडल्यानंतर हे वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. गुजरनगर येथे घडलेल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक धनराज किरनाळे अधिक तपास करीत आहेत. वारंवार होणाऱ्या या वाहनांच्या तोडफोडीच्या घटनांमुळे थेरगाव परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.