पिंपरी शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच : विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 15:20 IST2019-09-26T15:19:42+5:302019-09-26T15:20:16+5:30
शहरात विविध भागातून एका महागड्या सायकलसह तीन दुचाकींची चोरी झाली...

पिंपरी शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच : विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी : वाहनचोरीचे सत्र सुरूच असून शहरात विविध भागातून एका महागड्या सायकलसह तीन दुचाकींची चोरी झाली. या प्रकरणी मंगळवारी (दि. २४) चिंचवड, निगडी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायकल चोरीचा प्रकार वाल्हेकरवाडी येथे घडला. याप्रकरणी श्रेयस व्ही. जैन (वय २१, रा. वाल्हेकरवाडी) यांनी मंगळवारी (दि. २४) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी त्यांची २१ गिअर आणि डीस्कब्रेक असलेली १२ हजार रुपयांची सायकल इमारतीच्या पार्किंगमध्ये हॅन्डल लॉक करून ठेवली होती. चोरट्यांनी दि. ८ ऑगस्ट रोजी सायकल चोरून नेली.
दुचाकी चोरीबाबत संतोष मुरलीधर सुतार (वय ४०, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ११ सप्टेबर रोजी दुपारी तीन ते रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली. सुतार यांनी ४० हजार रुपये किमतीची दुचाकी निगडी येथील मॉलच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.
चिंचवड स्टेशन येथील एका दुकानासमोरून दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी एक ते १८ सप्टेबर रोजी सकाळी नऊच्या दरम्यान ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरी झाली. याप्रकरणी आकाश बाळू पालखे (वय २७, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड स्टेशन) यानी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चिखलीच्या घरकुल येथे सोसायटीच्या पार्किंगमधून शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरी केली आहे. याप्रकरणी रियासत गुलाब शेख (वय २७, रा. घरकुल, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.