पिंपरी-चिंचवड शहरात वाहने तब्बल २० लाख; वाहतूक पोलीस केवळ ३९८!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 04:15 PM2020-07-31T16:15:52+5:302020-07-31T16:24:41+5:30
शहरातील वाहतूक नियमन करताना पोलिसांना करावी लागत आहे कसरत..
नारायण बडगुजर
पिंपरी : उद्योगनगरी म्हणून नावारुपास आलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ ४८१ चौरस किलोमीटर आहे. यात २२५२ किलोमीटरचे रस्ते, महत्त्वाचे १५० चौक आहेत. या चौकांत व रस्त्यांवर वाहतूक नियमनासाठी १०० सिग्नल आहेत. तसेच शहरात १५ उड्डाणपूल असून २० लाखांवर वाहने आहेत. शहरात १० वाहतूक विभाग असून, ३८ ठिकाणे वाहतूक कोंडीची आहेत. मात्र या सर्वांचा भार ३९८ वाहतूक पोलिसांवर आहे. त्यामुळे वाहतूक नियमन करताना त्यांना कसरत करावी लागत आहे.
पिंपरी - चिंचवड आयुक्तालय १५ आॅगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाले. त्यावेळी शहरासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग अस्तित्वात आला. एक पोलीस उपायूक्त, एक सहायक पोलीस आयुक्त, नियोजनासाठी एक वरिष्ठ पोलीस निरिक्षक आणि ३९८ कर्मचारी या विभागासाठी नियुक्त आहेत. तसेच महापालिकेकडून १४० वॉर्डन वाहतूक विभागाला देण्यात आले. आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त यांच्याकडे वाहतूक विभागाचा पदभार आहे. वाहतूक विभागासह प्रशासन, अस्थापना, गुन्हे अशा विविध जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत. परिणामी त्यांना वाहतूक विभागासाठी पूर्णवेळ देता येत नाही.
वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त निलिमा जाधव निवृत्त झाल्या. त्यानंतर त्यांच्या जागी अद्यापही पूर्णवेळ अधिकारी नेमला गेला नाही. त्याचप्रमाणे वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या नियोजनाची जबाबदारी संभाळणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांची काही दिवसांपूर्वी आयुक्तालयाच्या विशेष शाखेत बदली झाली. मात्र, त्यांच्याही जागी अधिकारी नियुक्त न झाल्याने विशेष शाखेसह वाहतूक विभागाचीही जबाबदारी गोकुळे यांच्याकडेच आहे. सांगवी, हिंजवडी, निगडी, चिंचवड, पिंपरी, भोसरी, चाकण, दिघी - आळंदी, देहूरोड-तळेगाव, तळवडे अशा दहा वाहतूक विभागांसह वाहतूक नियंत्रण कक्ष असे अकरा विभाग सध्या अस्तित्वात आहेत. यातील पिंपरी विभाग शहरातील मध्यवर्ती आणि वर्दळीचा आहे. मात्र या विभागाला अधिकारी नाही.
पोलीस आयुक्तालयाकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ नाही. काही टप्प्यांमध्ये ते उपलब्ध होईल. वाहतूक विभागातील काही अधिकाऱ्यांची बदली झाली. तर काही निवृत्त झाले. त्यामुळे या विभागाला पूर्णवेळ उपायुक्त व सहायक आयुक्त उपलब्ध होण्याबाबत पोलीस महासंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच नवीन अधिकारी उपलब्ध होतील.
- सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड
पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतूक विभाग - 10
वाहतूक कोंडीची ठिकाणे - 38
ब्लॅक स्पॉट - 18
पोलीस आयुक्तालयहद्दीतून जाणारे महामार्ग
महामार्ग किमी
पुणे-नाशिक महामार्ग क्रमांक 60 - 29 (नाशिक फाटा ते भाम नदी, चाकण)
जुना पुणे-मुंबई महामार्ग क्रमांक 48 - 29 (बापोडी हॅरिस पूल ते तळेगाव दाभाडे)
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग 4 - ३५ (चांदणी चौक ते उर्से टोलनाका)
नो पार्किंग झोन ६७
पी-1/पी-2 २९
अवजड वाहने प्रवेश बंद 24
एकेरी वाहतूक 6