व्हेंडिंग मशिन ठरतेय विद्यार्थिनींसाठी वरदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 01:19 AM2018-10-24T01:19:54+5:302018-10-24T01:21:02+5:30
विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबत जागरूकतेचा अभाव दिसून येतो.
- प्रकाश गायकर
पिंपरी : विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबत जागरूकतेचा अभाव दिसून येतो. मुलींनी मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड वापरावेत तसेच स्वच्छतेबाबत त्यांच्यामध्ये जागरूकता व्हावी यासाठी महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन बसविण्यात आले आहे.
माध्यमिकच्या एकूण १८ शाळा आहेत. त्यामधील ७ शाळांमध्ये व्हेंडिंग मशिन बसविण्यात आले आहे. नऊ शाळांमध्ये मशिन बसविण्यात आले होते. मात्र आकुर्डी येथील शाळेतील मशिन नादुरुस्त झाले आहे. तर यशवंतनगर येथील क्रीडा प्रबोधिनी शाळेमध्ये वीजजोडणी नसल्याने मशिन बसविता आले नाही. उर्वरित पाच शाळांमध्ये मशिन बसविण्याचे काम सुरू आहे. तर उरलेल्या तीन शाळांसाठी मशिन येणे बाकी आहे.
मुली व महिलांना पॅड वापरण्यासाठी ‘पॅडमॅन’ चित्रपटातून जनजागृती करण्यात आली होती. पॅड वापरण्याचे फायदे यामध्ये मुली व महिलांना समजावून सांगण्यात आले आहेत. मासिक पाळीदरम्यान पॅड न वापरल्याने महामारी सारख्या भयंकर आजाराचा सामना करावा लागतो. तसेच पूर्वी या आजारामुळे अनेक स्त्रियांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील महिला तसेच शाळेतील ११ ते १९ वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी यासाठी अस्मिता योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शहरातील मुलींनीही याबाबत सजग व्हावे यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन बसविण्यात आले आहे. त्यामुळे मुलींना हव्या त्या वेळेत कॉईन टाकून पॅड उपलब्ध होते.
महापालिका शाळांमध्ये प्रामुख्याने झोपडपट्टी भागातील, मध्यमवर्गीय, गरीब कुटुंबातील मुली शिक्षण घेतात. अशा कुटुंबातल्या मुलींमध्ये मासिक पाळीदरम्यान घ्यावयाच्या काळजीचा अभाव दिसून येतो. ९त्यांच्यामध्ये मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज दिसून येतात. अशा मुलींमध्ये अनेक आरोग्याच्या तक्रारी आढळतात. या मुलींना मासिक पाळीदरम्यान पॅड वापरण्याची सवय लागावी व त्यांच्यातील गैरसमज दूर व्हावेत यासाठी व्हेंडिंग मशिनची योजना वरदान ठरत आहे. मुलींना शाळेमध्ये मशिनद्वारे सहज पॅड उपलब्ध होत असल्याने मुलींनी याचे स्वागत केले.
नि:संकोचपणे वापर करावा
उर्वरित शाळांमध्ये लवकरात लवकर व्हेंडिंग मशिन बसविण्याची आवश्यकता आहे. तसेच या मशिनच्या देखभाल व दुरुस्तीकडे शाळा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून मुलींना त्याचा फायदा होईल. ज्या शाळांमध्ये मशिन बसविणे बाकी आहे, अशा शाळेतील मुख्याध्यापकांनी यासाठी पुढाकार घेणे
आवश्यक आहे.
व्हेंडिंग मशिन मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये बसविले जाते. त्यामुळे मुलींना हव्या त्या वेळेस संकोच न करता त्याचा वापर करता येतो. मुलींनी आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिनचा वापर केला पाहिजे.
>सात शाळांमध्ये मशिन बसवून सुरू करण्यात आल्या आहेत. बाकीच्या शाळांमध्येही मशिन बसविण्याचे काम सुरू आहे. मुलींच्या चांगल्या आरोग्यासाठी याची आवश्यकता आहे. मुलींनीही त्याचा वापर करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
- पराग मुंडे, सहायक प्रशासन अधिकारी, माध्यमिक विभाग
>माध्यमिक शाळांमध्ये व्हेंडिंग मशिन बसवून पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक शाळेतही हे मशिन बसविण्यात येणार आहे. शाळेतील अनेक मुलींमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणावर गैरसमज असतो. अनेक मुली पॅड वापरण्याऐवजी कापडाचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होतो. शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध होत असल्यामुळे मुली त्याचा वापर करतील.
- सोनाली गव्हाणे, सभापती, शिक्षण समिती पिं. चिं. मनपा