पशुवैद्यकीय इमारत धुळीत
By admin | Published: June 7, 2017 01:37 AM2017-06-07T01:37:33+5:302017-06-07T01:37:33+5:30
तालुका लघुपशु सर्व चिकित्सालय यात जनावरे उपचारासाठी येत नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांची इमारत धूळ खात पडून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : येथे असलेल्या तालुका लघुपशु सर्व चिकित्सालय यात जनावरे उपचारासाठी येत नसल्यामुळे कोट्यवधी रुपयांची इमारत धूळ खात पडून आहे. दिवसभरात एक किंवा दोन कधी कधी दिवसभरात काहीच नसल्यामुळे अधिकारी व कर्मचारी दिवसभर गप्पा मारत बसून दिवस काढत आहेत. त्यामुळे या दवाखान्यावर शासनाचे लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर आणि मावळ तालुक्यातीलपशुधनावर उपचार लघुपशु सर्व चिकित्सालय इमारत बांधण्यात आली आहे. या चार तालुक्यांत जवळपास २९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या चारही तालुक्यांत महिनाभरात सरासरी दोन ते अडीच हजार जनावरांवर उपचार केले जातात. चारा, पाणीटंचाई आणि शेतीमालाला कमी भाव यामुळे पशुधनात अलीकडच्या काळात मोठी घट झाल्याचे चित्र खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ तालुक्यात बघायला मिळत आहे. राजगुरुनगर येथील लघुचिकित्सालय केंद्रात जनावरांचे विविध आजारांचे नमुने तपासण्याची सुविधा आहे. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना हा दवाखाना चालू आहे का बंद आहे, हेच माहीत नाही. राजगुरुनगर शहरातील रहदारीच्या ठिकाणी हा दवाखाना असल्याने, वाहतूककोंडीतून आजारी जनावरे न्यायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत असल्याने शेतकरी खासगी डॉक्टरकडून जनावरांवर उपचार करून घेत आहेत. त्यामुुळे येथे असलेल्या सुविधांचा उपयोग होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
राज्य शासनाच्या अधिपत्याखाली बांधण्यात आलेले येथील सहायक आयुक्त असलेले पशुसंवर्धन तालुका लघुपशु सर्व चिकित्सालय इमारत बांधण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी ही इमारत बांधकाम खात्याकडून पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेतली, मात्र या इमारतीत अनेक सुविधांचा अभाव आहे.
२ कोटी रुपये खर्चून येथील पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाची इमारत बांधण्यात आली आहे. माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितींच्या माध्यमातून दोन कोटी रुपये खर्चून चार तालुक्यांसाठी येथे सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघुसर्व चिकित्सालय इमारत येथे बांधण्यात आली.
मात्र चुकीच्या पद्धतीने इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. दिवसभरात या दवाखान्यात दोन गायी किंवा पाळीव कुत्री घेऊन उपचारासाठी येत असतात. तसेच इमारतीत जनावरांची शस्त्रक्रिया, खच्चीकरण करण्यासाठी तयार केलेले कॉस्टिंग शेडमध्ये अजून एकाही जनावराची शस्त्रक्रिया अथवा खच्चीकरण झाले नाही. तसेच इमारतीच्या आतील बाजूस असलेला खोड्या एकही जनावर गेले नाही. या दवाखान्यात पाच लाख रुपये किमतीच्या जनावरांची सोनोग्राफी मशिन केवळ डॉक्टरांना हाताळता येत नसल्याने बंद असून ते सध्या धूळ खात पडून आहे.
>पदे रिक्त : खर्च वाया जाण्याची भीती
राजगुरुनगर येथील सहायक आयुक्त तालुका लघुसर्व चिकित्सालयांतर्गत जुन्नर तालुक्यात ३, आंबेगाव तालुक्यात ६, खेड तालुक्यात १३ आणि मावळ तालुक्यात ७ असे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या विभागीय कार्यालयात असलेले सहायक आयुक्त हे पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे.
पुणे जिल्ह्यात केवळ चार ठिकाणी सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका लघुपशु सर्व चिकित्सालय आहेत. खेड, आंबेगाव, जुन्नर आणि मावळ या तालुक्यात सर्वाधिक पशुधन असताना जनावरांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध असताना उपचारासाठी जनावरेच येत नसल्याने शासनाचा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
सर्व प्रकारच्या जनावरांची रक्ततपासणी, कल्शियम, फॉस्फरस यासह जनावरांच्या विविध आजारांच्या विविध तपासण्या आणि औषधोपचार आणि शस्त्रक्रिया आदी सुविधा उपलब्ध आहेत, असे असताना मावळ, जुन्नर आणि आंबेगावचे शेतकरी पशुधन आणत नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पशुधन पर्यवेक्षक व कर्मचारी उपचार करतात. मागील महिन्यात गाय, बैल, म्हैस, शेळ््या, मेंढ्या, कुत्री, मांजरी, कबुतरे, कोंबड्या अशा १५० प्राण्यांवर उपचार करण्यात आले आहेत. सोनोग्राफ्री मशिनचे प्रशिक्षण नसल्यामुळे मशिन बंद आहे. त्याला कंपनीने साडेतीन लाख रुपये खर्च सांगितला आहे. एक्स-रे मशिन उपलब्ध होणार आहे.
- डॉ. श्रीकांत कोहोक,
तालुका लघुसर्व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त