पिंपरी-चिंचवड शहर कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष व वस्ताद पोपटराव फुगे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 07:20 PM2020-09-28T19:20:07+5:302020-09-28T19:20:56+5:30
भोसरी पंचक्रोशीत 'वस्ताद' म्हणून ते परिचित होत..
भोसरी : पिंपरी-चिंचवड शहर कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष व वस्ताद पोपटराव सदाशिवराव फुगे (वय ६५) यांचे हृदयविकाराने सोमवारी निधन झाले. नगरसेविका भीमाबाई फुगे यांचे ते पती होत. फुगे यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
भोसरी पंचक्रोशीत 'वस्ताद' म्हणून ते परिचित होत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांच्या आरोग्यात सुधारणा देखील झाली होती. परंतु, तत्पूर्वीच सोमवारी (ता. २८) सकाळी त्यांचे रुग्णालयातच हृदयविकाराने निधन झाले.
तरुणांनी कुस्तीकडे 'प्रोफेशन' म्हणून पाहावे यासाठी ते प्रयत्नशील होते. यासाठी तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे काम फुगे करत होते. भोसरी गावजत्रा मैदानात प्रमुख पंच म्हणूनही ते जबाबदारी पार पाडत होते. महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन व व्यायाम मंडळाचे ते वस्ताद होते. ते फुगे-माने तालीम मंडळाचे अध्यक्षही होते. भोसरी दरवर्षी होणाऱ्या वैष्णव विचार कीर्तन महोत्सव भरविण्यामध्येही त्यांचे सहकार्य असायचे. त्यांना क्रीडा क्षेत्राची आवड असल्याने खेळाडूंसाठी स्पर्धेचे आयोजन करायचे. त्यांनी दहा वर्षापूर्वी कै. सदाशिवराव फुगे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय कुस्ती आणि कबड्डी स्पर्धा भरविली होती.