पीएमपी बसमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:56 PM2019-03-30T23:56:17+5:302019-03-30T23:56:47+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : फुकटच्या जाहिरातींमुळे विद्रूपीकरण, कारवाई करण्याची प्रवाशांनी केली मागणी
शीतल मुंडे
पिंपरी : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) पाहिले जाते. शहरातील शेकडो मार्गांवरून बसच्या फेऱ्या होतात. दररोज हजारो प्रवासी पीएमपीने प्रवास करतात. या बस स्वच्छ असणे अपेक्षित आहे. मात्र, डेपोतून स्वच्छ होऊन निघालेल्या बसचे काही जणांकडून विद्रूपीकरण होत आहे.
जाहिरातबाजी, काही प्रवाशांच्या थुंकण्यासारख्या गलिच्छ सवयी यांमुळे हा प्रकार होत आहे. करणी, बुवाबाजी, काही अशास्त्रीय इलाजाचे दावे करणाऱ्या जाहिरातींचे बेकायदापणे चिकटविलेले स्टिकर यांचा या विद्रूपीकरणात मोठा हातभार आहे. विद्रूपीकरणासह अंधश्रद्धेलाही यातून खतपाणी घालण्यात येत असले, तरी यावर प्रवासी, अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पदाधिकाºयांचाही अंकुश नसल्याने त्यामध्ये वाढ होत आहे. प्रवाशांना सहज वाचता येईल किंवा दिसून येईल, अशा पद्धतीने या जाहिराती चिकटविण्यात येतात.
आजाराबाबतही चुकीची जाहिरातबाजी
४मन चाहा प्यार, सौतन से छुटकारा, वशीकरण बाबा-बुवांचे बोल, घरबसल्या ए टू झेड समस्यांवर खात्रीशीर उपाय, विविध रोगांवर रामबाण औषध, विवाह संस्था, घरी बसून ३० हजार रुपये कमवा, दारू सोडवा, गुंठेवारी, जागा खरेदी-विक्री, करणी करणे, प्रेमविवाह अशा विविध प्रकारच्या जाहिराती चिकटविण्यात येतात. झेरॉक्स चिकटवून वा विविध आकारांतील स्टिकरचा त्यासाठी वापर करण्यात येतो.
जाहिराती चिकटविणाºयांचा शोध घेणे आवश्यक
४बसमध्ये जाहिरात चिकटविणाºयांचा शोध घेणे आवश्यक आहे. जाहिरातीमध्ये संपर्कासाठी मोबाइल क्रमांक दिला जातो. त्यामुळे जाहिरातदारांचा किंवा जाहिराती चिकटविणाºयांचा शोध घेणे सहजशक्य आहे. मात्र त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. अशा प्रकारे जाहिरातबाजी करून बसचे विद्रूपीकरण करणाºयांवर कारवाईची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
कारवाई करण्यात प्रशासन अपयशी
४बसमधील काही जाहिराती आक्षेपार्ह असतात. अशा प्रकारांकडे पीएमपी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तसेच बसच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाºया तेजस्विनी बस, ई-बस यांमध्येही असे विद्रूपीकरण सर्रास दिसून येते.
प्रत्येक बसमध्ये या जाहिराती बघायला मिळतात. जमीन खरेदी-विक्रीसह विविध प्रकारच्या जाहिराती लावण्यात येतात. जाहिरातींमध्ये संबंधित व्यक्तींचा संपर्क क्रमांकही नमूद करण्यात आलेला असतो. त्यामुळे त्यांना त्वरित आणि चांगला प्रतिसाद मिळत असावा. त्यामुळे या जाहिरातींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. फुकट जाहिरातीमुळे बसचे विद्रुपीकरण मोठ्याप्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. - संतोष शिंदे, प्रवासी
पीएमपीचा थांबा आणि बसमध्येही जाहिराती चिकटविण्यात येतात. फुकटात जाहिरातबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे पीएमपी बससह थांब्यांचेही विद्रूपीकरण होत आहे. अशा जाहिराती हटविणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. प्रशासनाने याबाबत यंत्रणा कार्यान्वित करून अशा जाहिरातींना आळा घातला पाहिजे.
- स्वप्निल देशपांडे, प्रवासी
पीएमपी बसमध्ये प्रवास करीत असताना वशीकरण करणे, संतानप्राप्ती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती लावण्यात येतात. प्रवाशांचे लक्ष वेधले जाईल अशा पद्धतीने जाहिराती चिकटविल्या जातात. एखाद्या व्यक्तीवर करणी कशी करावी किंवा कशा पद्धतीने वशीकरण करावे, याबाबत संपर्काचे आवाहन करणारा मजकूर या जाहिरातींमध्ये असतो.
- स्रेहा सोनवणे, प्रवासी