पराभूत उमेदवाराच्या भावाची एकास मारहाण
By admin | Published: February 26, 2017 03:45 AM2017-02-26T03:45:40+5:302017-02-26T03:45:40+5:30
महापालिका निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग मनात धरून तरुणाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण करण्याची घटना म्हाळुंगे क्रीडानगरीसमोरील राधा चौकात घडली.
वाकड : महापालिका निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग मनात धरून तरुणाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण करण्याची घटना म्हाळुंगे क्रीडानगरीसमोरील राधा चौकात घडली. महापालिकेच्या प्रभाग २५ मधील भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार राम वाकडकर यांच्या भावासह अन्य आठ जणांवर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील पाच जण फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद वाकडकर, तेजस देवकर, चंद्र्रकांत देवकर (तिघेही रा. वाकडकरवस्ती, वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. म्हातू वाकडकर यांच्यासह अन्य चारजण फरार आहेत. या प्रकरणी अक्षय तानाजी कलाटे (वय २०, रा. शिवराजनगर वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. अक्षय महाशिवरात्री निमित्ताने मोटारीतून पाषाण सोमेश्वरवाडी येथे दर्शनासाठी गेला होता. तेथून परतत असताना विनोद वाकडकर व त्यांच्या अन्य साथीदारांनी म्हाळुंगे क्रीडासंकुलासमोर त्याला गाठले. तू वेडे वाकडे वाहन का चालवतो आहेस असे कारण पुढे करून हटकले. निवडणुकीत तू कोणाचे काम केलेस ते आम्हाला माहिती आहे. असे म्हणत त्याला मारहाण केली.
अक्षयला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून
जखमी केले. निवडणूक निकाल लागल्यानंतर हाणामारीची ही दुसरी घटना आहे. (वार्ताहर)