VIDEO : थेट खिशात लाच स्वीकारताना महिला वाहतूक पोलीस सोशल मीडियावर ‘व्हायरल’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 08:54 PM2020-12-16T20:54:50+5:302020-12-16T20:59:45+5:30
एक महिला वाहतूक पोलीस खिशात लाच स्वीकारत असल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे...
पिंपरी : वाहतूक नियमनासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. वाहनचालकांसह वाहतूक पोलीसही या कॅमेऱ्यांच्या निगराणीत येतात. असे असतानाही काही वाहतूक पोलीस वाहनचालकांकडून लाच स्वीकारत असल्याचे दिसून येते. अशीच एक महिला वाहतूक पोलीस खिशात लाच स्वीकारत असल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याचा सातत्याने आढावा घेतला जात असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जोरदार कारवाई सुरू आहे. पिंपरीतील साई चाैक व शगुन चौकात वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत होती. या कारवाई दरम्यानची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
थेट खिशात लाच स्वीकारताना महिला पोलीस 'व्हायरल'! #punepolice#bribepic.twitter.com/Jl9zhqD40z
— Lokmat (@MiLOKMAT) December 16, 2020
एका दुचाकीवरील दोन महिलांना वाहतूक पोलिसांनी अडविले. त्यापैकी एक तरुणी तेथील महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याच्या जवळ येते. महिला पोलीस त्या तरुणीला सूचना देते. त्यानंतर तरुणी पुन्हा महिला पोलिसाजवळ येते. त्यावेळी महिला पोलीस तिला पाठमोरी होते. सूचनेप्रमाणे तरुणी महिला पोलिसाच्या मागच्या खिशात पैसे ठेवत असल्याचे क्लिपमध्ये दिसून येते.
पिंपरीतील शगुन चाैक येथील ही क्लिप असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. याबाबत चाैकशी करण्यात येत आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- श्रीकांत डिसले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड