Video: अग्निशामक दलाचे जवान देवदुतासारखे धावून आले अन् आमच्या जीवात जीव आला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 04:20 PM2022-12-09T16:20:31+5:302022-12-09T16:22:34+5:30

अग्निशामक दलाचे जवान धावून आले आणि त्यांनी इमारतीमधून आम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढले.

Video: Firefighters came running like angels and saved our lives | Video: अग्निशामक दलाचे जवान देवदुतासारखे धावून आले अन् आमच्या जीवात जीव आला

Video: अग्निशामक दलाचे जवान देवदुतासारखे धावून आले अन् आमच्या जीवात जीव आला

Next

पिंपरी : अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने कार्यालयातून बाहेर गेलो तर काही जण आरडाओरडा करत धावत असल्याचे दिसले. तसेच सर्वत्र काळोख आणि धूर असल्याने काहीही दिसत नव्हते. त्यामुळे पुन्हा कार्यालयातच आलो. मात्र धुरामुळे गुदमरायला लागले. दम्यामुळे त्रास अधिक जाणवत होता. श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. त्याचवेळी अचानक देवदूत अवतरावेत तसे अग्निशामक दलाचे जवान धावून आले आणि त्यांनी इमारतीमधून आम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढले. हे प्रसंग कथन आहे आगीच्या दुर्घटनेतील बचावलेल्या संतोष गाड (वय ५८) यांचे.

रहाटणी येथील शिवार चौकातील रेनबो प्लाझा या इमारतीत आग लागल्याने पाचव्या मजल्यावर काही नागरिक अडकले होते. त्यावेळी संतोष गाड हे सहकाऱ्यांसह नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयात कामकाज करीत होते. त्यावेळी त्यांच्या कार्यालयातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर जनरेटरचा वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, तोही लगेचच खंडित झाला. त्यामुळे गाड हे कार्यालयाबाहेर गेले. त्यावेळी काही जण आरडाओरडा करत धावत होते. आग लागली आहे, बाहेर चला, असे काही जण म्हणाले. त्यामुळे गाड आणि त्यांचे सहकारी हे जिन्याकडे जायला लागले. मात्र, धूर आणि अंधारामुळे त्यांना काहीही दिसेनासे झाले. तसेच धुरामुळे गुदमरायला लागले. त्यामुळे गाड हे परत कार्यालयात आले. मात्र, तेथेही धुरामुळे त्यांना त्रास होऊ लागला. काही वेळाने धूर जास्त झाल्याने श्वास घेणे अवघड झाले. दम्याचा त्रास असल्याने गाड यांच्या अडचणीत भर पडली.

''मदतीच्या अपेक्षेने आम्ही खिडकीतून बाहेर डोकावत होतो. त्याचवेळी बाहेरील मोकळी हवा घेण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र, धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. बाहेर धुरामुळे सर्वत्र काळोख आणि मनात काहूर उठले होते. मात्र, त्याचवेळी अग्निशामक दलाचे जवान मदतीसाठी देवदुतासारखे धावून आले. - संतोष गाड''

''आम्ही तीन ते चार महिला आणि इतर काही जण तिसऱ्या मजल्यावर अडकलो होतो. धूर जास्त असल्याने गुदमरत होते. प्रसंग बाका होता. मात्र, अग्निशामक जवानांनी आम्हाला सुरक्षित बाहेर काढले. - सीमा कदम''

''भितीने मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता काय होईल, कशी सुटका होईल, अशी चिंता होती. नातेवाइक तसेच इतर सहकारी फोन करून धीर देत होते. दोरीच्या साह्याने खिडकीतून बाहेर काढून अग्निशामकच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. - माधुरी आवारी'' 

Web Title: Video: Firefighters came running like angels and saved our lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.