VIDEO : डोळे सुजेपर्यंत शिक्षिकेने केली चिमुरड्यास मारहाण, पिंपळे गुरव येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 10:11 PM2017-09-13T22:11:31+5:302017-09-13T22:11:31+5:30
शिशुवर्गात शिकणा-या अवघ्या तीन वर्षांच्या बालकाला शिक्षिकेने लाकडी पट्टीने मारहाण केली. यात बालकाच्या डोळ्यांना मार लागला असून, तीन दिवसांपासून डोळ्यांना सूज आली आहे.
पिंपरी, दि. 13 - शिशुवर्गात शिकणा-या अवघ्या तीन वर्षांच्या बालकाला शिक्षिकेने लाकडी पट्टीने मारहाण केली. यात बालकाच्या डोळ्यांना मार लागला असून, तीन दिवसांपासून डोळ्यांना सूज आली आहे. देव कशप असे या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यास गेले असता, पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली नसल्याची पालकांची तक्रार आहे.
पिंपळे गुरव येथील भाऊनगरमध्ये राहणा-या कशप कुटुंबातील देव या चिमुरड्यास शिक्षिकेने बेदम मारहाण केली आहे. लाकडी पट्टीने मारताना, त्या बालकाच्या चेह-यावर पट्टीचा मार बसला. पाठीवर मारल्याचे व्रण आहे. डोळ्याचे रक्त साकळले, दोन्ही डोळे सुजले. बालकाला वेदना होऊ लागल्या. दोन्ही डोळे सुजल्याने त्याच्या दृष्टीला बाधा पोहोचली.
बालकाचे वडील संतोष कशप, आई लक्ष्मी कशप यांनी पिंपळे गुरव पोलीस चौकीत धाव घेतली. मात्र तेथे त्यांना सांगवी पोलिसांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांनी सांगवी पोलीस ठाणे गाठले. संबंधित शिक्षिकेविरुद्ध फिर्याद दाखल करायची असल्याचे सांगितले; परंतु पोलिसांनी अगोदर वैद्यकीय तपासणी करून या, नंतर पुढील कार्यवाही करू, असे सांगितले. औंध येथील शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यास सांगितले. मात्र महिलेला त्यासाठी धावाधाव करणे शक्य नव्हते. अखेर मजूर दांपत्य बालकाला घेऊन घरी गेले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे का, याबाबत विचारणा केली. त्यावर तक्रार दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बालकाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. तेथून महिला बालकाला घेऊन परत आली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
नदीकिनारी राहणा-या संबंधित दांपत्याकडे जाऊन माहिती घेतली असता, घडला प्रकार त्यांनी सांगितला. या परिसरात लहान मुलांची खासगी शिकवणी घेणा-या भाग्यश्री नावाच्या शिक्षिकेचा हा प्रताप असल्याची बाब उघडकीस आली. बालकाचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात, तर आई मजुरी करते. तीन दिवसांपासून बालकाच्या डोळ्यावर असलेली सूज अद्यापही उतरलेली नाही.