VIDEO : दोन मद्यपींचा भररस्त्यात धिंगाणा; ये-जा करणाऱ्या वाहनांची कोयत्याने तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:30 PM2021-07-05T21:30:57+5:302021-07-05T21:45:38+5:30
पिंपळे निलख येथे भररस्त्यात माजविली दहशत
पिंपरी : दोन दारुड्यांनी भररस्त्यात उभे राहून वाहनचालकांना शिवीगाळ केली. तसेच कोयत्याने वाहनांची तोडफोड करून दहशत माजविली. पिंपळे निलख येथे बाणेर रस्त्यावर शनिवारी रात्री ही घटना घडली.
प्रतिक संतोष खरात, चेतन जावरे (दोघेही रा. पिंपळे निलख), अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक करून सोमवारी मोरवाडी, पिंपरी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिंपळे निलख येथील बाणेर रस्त्यावर दहशत माजविली. ये-जा करणाऱ्या वाहनांवर कोयत्याने मारून तोडफोड केली. यात दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे नुकसान केले. काही वाहनचालकांवर कोयत्याने वार केले. मात्र यातून ते वाहनचालक बचावले. तसेच काही दुचाकीस्वारांना त्यांची दुचाकी रस्त्यावर सोडून बचावासाठी पळ काढावा लागला. हा प्रकार बघून काही वाहनचालकांनी आपली वाहने वळविली. आरोपींनी आरडाओरडा करून वाहनचालकांना शिवीगाळ केली. एका नागरिकाने मोबाइलमध्ये हा प्रकार शुट केला. मात्र याप्रकरणी कोणीही तक्रार देण्या पुढे आले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
दोन दारुड्यांचा धिंगाणा; रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची कोयत्याने केली तोडफोड; पिंपरीतील पिंपळे निलख येथे भररस्त्यात माजवली दहशत https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/o222B4auDQ
— Lokmat (@MiLOKMAT) July 5, 2021
डोक्यात कोयता मारून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी खरात आणि जावरे या दोघांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. ४) गुन्हा दाखल केला. जितेंद्र छोटीलाल ठाकूर (वय २३, रा. पिंपळे निलख, मूळगाव खेतको, जि. गिरिडिह, झारखंड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. आरोपी हे पिंपळे निलख येथे नदीपात्राच्या कडेला नेहमी दारू पिण्यासाठी जातात. फिर्यादी हे पिंपळे निलख येथे नदीपात्रालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमधील त्यांच्या रुममध्ये जेवण बनवित होते. तेव्हा आरोपी पाणी पिण्यासाठी आले. आरोपी जावरे याने फिर्यादीकडे पैसे मागितले. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी खरात याने त्याच्या पाठीमागे कमरेला लपविलेला कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.