Vidhan Sabha 2019 : पुण्यानंतर पिंपरीत कोणाचे तिकीट कापणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 08:23 PM2019-09-30T20:23:00+5:302019-09-30T20:23:09+5:30
भारतीय जनता पक्षाने पुण्यातील तीन विद्यमान आमदारांची तिकीटे कापली असून पिंपरी-चिंचवडमधील कोणाचे तिकीट कापणार?याकडे सर्वांचे लक्ष आहे ..
पिंपरी : भारतीय जनता पक्षाने पुण्यातील तीन विद्यमान आमदारांची तिकीटे कापली असून पिंपरी-चिंचवडमधील कोणाचे तिकीट कापणार? कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असणाºयांनी धास्ती घेतली आहे. तर शिवसेनेची वाट धरणाऱ्यांचे मनसुभे धुळीस मिळाले आहेत.
विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसांपर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी व शहरालगत मावळ असे विधानसभेचे चार मतदार संघ आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी कोणता मतदार संघ कोणास याबाबत निर्णय झालेला नाही. काँग्रेसनेही एक जागा द्यावी, अशी मागणी केली आहे. तर राष्टÑवादीने तीनही मतदार संघ राष्ट्रवादीला मिळाल्याचे जाहिर केले आहे. पिंपरीवर आरपीआय आठवले गटानेही दावा केला आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहिर केलेली नाही. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
शिवसेनेची वाट धरणाऱ्याची लागली वाट
शिवसेना भाजपाची युती होणार की नाही? याबाबत उत्सुकता आणि प्रतीक्षा होती. मात्र, यावर आज पडदा पडला आहे. महायुतीची घोषणा झाल्याने अनेकांच्या पक्षांतर करणाऱ्यांच्या मनसुभ्यांवर पाणी फेरले आहे. भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदार संघांवर शिवसेनेने दावा केला होता. तर गेल्या काही दिवसांपासून पिंपरीवरही भाजपाने दावा केला होता. महायुती फिस्कटली तर भाजपाकडून कोण आणि शिवसेनेकडून कोण अशी तयारी पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांनी केली होती. तीनही मतदार संघात दोन्ही पक्षांचे स्वतंत्र उमेदवार उभे करता येऊ शकतात, अशी तयारीही दोन्ही पक्षांनी केली होती. अनेकांनी मुख्यमंत्री तसेच मातोश्रीची वारीही केली होती. मात्र, युतीची घोषणा झाल्याने शिवसेनेकडून लढणाऱ्यांची वाट लागली आहे. आघाडीचेही घोंगडे भिजत पडले आहे.
विद्यमानांना संधी की पत्ता कटणार?
भोसरीत भाजपा संलग्न आमदार महेश लांडगे, पिंंपरीत शिवसेनेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार, चिंचवडला भाजपा आमदार लक्ष्मण जगताप, मावळात भाजपाचे आमदार बाळा भेगडे आहेत. पुण्यात विद्यमान तीन आमदारांचा पत्ता कट केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये काय होणार? याबाबत उत्सुकता आहे. विद्यमानांना संधी मिळणार? की नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे नेत्यांनी धसका घेतला आहे.