पवनानगर परिसरात सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:42 AM2018-08-14T01:42:16+5:302018-08-14T01:42:32+5:30
पवना धरणातून सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून ४४५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. शिवली येथील पूल पाण्याखाली गेला आहे.
पवनानगर : पवना धरणातून सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून ४४५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. शिवली येथील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे परिसरातील शिवली, भडवली, काटेवाडी, येवलेवाडी, येलघोल, धनगव्हाण या गावांचा या पुलावरून होणारा संपर्क तुटला आहे.
पवना धरण १०० टक्के भरले आहे. शुक्रवारी (दि. १०) धरणाच्या सांडव्यावरून ८०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे सकाळी १५०० क्युसेकने आणि सायंकाळी २२०८ क्युसेकने पाणी सोडण्यात आले
आहे. रात्रभर पावसाचे प्रमाण वाढल्याने रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ३३८५क्यसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु, पवनमावळ परिसरात पावसाचा
जोर वाढल्याने धरणाच्या सहा दरवाजातून ४५७० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे ए. एम. गदवाल यांनी दिली.
वडिवळे हाऊसफुल्ल
कामशेत : मावळासह कामशेत शहरात पावसाची संततधार सुरू असून मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार पडणाऱ्या या पावसामुळे मावळ परिसरातील शेतकरी सुखावला आहे, तर नाणे मावळातील वडिवळे धरण सोमवारी १०० टक्के भरले आहे. धरणाचे दोन दरवाजे १० सेंमीने उघडले असून, ५५० क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे. आठवडाभरापासून पावसाने पुन्हा चांगला जोर धरला आहे. नाणे मावळ परिसरात सर्वत्र संततधार आहे. गेले दीड ते दोन महिने पडणाºया पावसामुळे वडिवळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन सोमवारी सकाळी धरण १०० टक्के भरले. सकाळी १० वाजल्यापासून धरणाचे दोन दरवाजे १० सेंमीने सुरू केले आणि ५५० क्युसेकने पाणी विसर्ग सुरु करण्यात आला. नदी किनारी गावांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याची माहिती वडिवळे धरण शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.