Pimpri Chinchwad : पोलिसांच्या सतर्कतेने वाचला महिलेचा जीव; रुग्णवाहिका चालवून नेले रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 01:04 PM2023-08-24T13:04:21+5:302023-08-24T13:05:38+5:30
विषारी औषध प्राशन केलेल्या एका महिलेवर पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने वेळेत उपचार झाल्याने, तिचा जीव वाचविण्यात यश आले आहे....
रावेत (पुणे) : पोलिस केवळ खाक्याच दाखविण्यासाठी नसून, वेळप्रसंगी कठीण प्रसंगी देवदूत बनूनही मदतीला येऊ शकतात, हे आज रावेतच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. विषारी औषध प्राशन केलेल्या एका महिलेवर पोलिसांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने वेळेत उपचार झाल्याने, तिचा जीव वाचविण्यात यश आले आहे.
बुधवारी सकाळी साधारणतः साडेनऊ वाजता मस्के वस्ती रावेत येथ एक महिला सुरक्षा प्रमोद मांडले हिने विषारी औषध प्राशन केले आहे. ‘तिला वाचवा’ असा कॉल पोलिस नियंत्रण कक्षातून रावेत पोलिस स्टेशनच्या बीट मार्शल पोलिस कर्मचाऱ्यांना आला. काही मिनिटांतच पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मस्के वस्ती येथे पोहोचले.
पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे यांनी पोलीस शिपाई दया देवकर, संदेश जाधव, नवीन चव्हाण, अजित बेंडभर यांनी तत्काळ ॲम्बुलन्सचा शोध घेतला, परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेला रिक्षामधून रावेत येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. येथील डॉक्टरांनी तत्काळ यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये यांना घेऊन जावे लागेल, असे सांगितले. तेथे हॉस्पिटलची ॲम्बुलन्स उपलब्ध आहे. मात्र, ड्रायव्हर नसल्याचे समजताच, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सात्रस यांनी स्वतः ॲम्बुलन्स चालवत महिलेला वायसीएम येथे नेले. पोलिसांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे संबंधित महिलेचा जीव वाचविण्यास मदत झाली.