Pimpri Chinchwad: गावठी दारुची वाहतूक, मद्यासह टेम्पो जप्त; एक्साइज विभागाची कारवाई
By नारायण बडगुजर | Published: April 30, 2024 07:50 PM2024-04-30T19:50:25+5:302024-04-30T19:50:52+5:30
गावठी दारू व टेम्पो असा पाच लाख ३९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. ....
पिंपरी : गावठी दारुची वाहतूक होत असल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साइज) ‘फ’ (पिंपरी-चिंचवड) विभागातर्फे मोठी कारवाई करण्यात आली. यात चारचाकी टेम्पोसह ३७५ लिटर गावठी दारु, असा पाच लाख ३९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कुदळवाडी येथे शनिवारी (दि. २७) ही कारवाई केली.
एक्साइजच्या ‘फ’ विभागाचे निरीक्षक संदीप मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडी येथे एका चारचाकी टेम्पोमधून हातभट्टीच्या गावठी दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक्साइजच्या फ विभागाकडून सापळा लावण्यात आला. संशयित टेम्पोला थांबवून तपासणी केली असता त्यात प्लास्टिक कॅनमध्ये ३७५ लिटर गावठी दारू मिळून आली. गावठी दारू व टेम्पो असा पाच लाख ३९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.
दरम्यान, फ विभागाने आणखी दोन कारवाया केल्या. यात पहिल्या कारवाईमध्ये एक संशयित दुचाकीस्वाराला थांबवले असता त्याच्याकडे बिअर, विदेशी मद्य मिळून आले. ते मद्य आणि दुचाकी असा एूण ५३ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल ‘फ’ विभागाच्या पथकाने जप्त केला. दुसऱ्या कारवाईत एका संशयित चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यात १७५ लिटर गावठी दारु मिळून आली. गावठी दारुसह चारचाकी वाहन असा एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एक्साइजच्या ‘फ’ विभागाचे निरीक्षक संदीप मोरे, दुय्यम निरीक्षक माधवी गडदरे, संतोष कोतकर, सहायक दुय्यकम निरीक्षक डी. के. पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
दीड महिन्यात ४५ गुन्हे ४३ संशयितांना बेड्या
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक्साइजच्या पिंपरी-चिंचवड ‘फ’ विभागातर्फे अवैध दारू वाहतूक, अवैध दारू विक्री, हातभट्टीवर कारवाई सुरू आहे. आचारसंहितेच्या दीड महिन्याच्या कालावधीत अवैध दारू धंद्यांप्रकरणी ४५ गुन्हे दाखल केले. याप्रकरणी ४३ संशयितांना अटक केली असून सहा संशयितांचा शोध सुरू आहे. विविध कारवायांमध्ये २९४२ लिटर गावठी दारू, ११७.९० लिटर देशी मद्य, ६९.७५ लिटर विदेशी मद्य, ५८.९० लिटर बिअर, ७८९ लिटर ताडी तसेच तीन वाहने जप्त केली. यात एकूण ११ लाख नऊ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.