कृषी पर्यटनातून गवसतेय हरवलेले गाव...!

By Admin | Published: May 16, 2016 01:17 AM2016-05-16T01:17:02+5:302016-05-16T01:17:02+5:30

शहरातली लोक आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी ग्रामीण भागांना भेटी देत आहेत

The village lost due to agricultural tourism ...! | कृषी पर्यटनातून गवसतेय हरवलेले गाव...!

कृषी पर्यटनातून गवसतेय हरवलेले गाव...!

googlenewsNext

प्राची मानकर

पुणे : गाव हरवत चाललंय असं आपण म्हणतो; पण आज आवर्जून शहरातली लोक आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी ग्रामीण भागांना भेटी देत आहेत, यामध्ये चूल म्हणजे काय, विहीर, शेतात पिकविल्या जाणाऱ्या भाज्या, पाटाचं पाणी, बैलगाडीत बसून ग्रामफेरी, शिवारफेरी, झुणका-भाकर, हुरडा अशी सगळी महाराष्ट्रीयन ओळख आज शहरी पर्यटक मोठ्या उत्साहाने आपल्या मुलांना करून देत आहेत, त्यामुळे हरवलेल गाव कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सापडायला मदत झाली आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे, महाराष्ट्रातील पर्यटनाचा नवीन चेहरा म्हणून पुढे येणारे माध्यम म्हणजे कृषी पर्यटन आहे. त्यामुळे परदेशी पर्यटकसुद्धा कृषी पर्यटनाला भेटी देत आहे. आणि महाराष्ट्राची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आज देशात कृषी पर्यटन व्यवसायात महाराष्ट्र राज्य इतर राज्यांच्या मानाने नंबर एक स्थानावर आहे. शहरी पर्यटकांना गावाकडच्या मोकळ्या वातावरणाचा अनुभव घेता यावा, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घेता यावे आणि त्याचा आनंद उपभोगता यावा, याकरिता कृषी पर्यटन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठ्याप्रमाणात मदत करीत आहे.
आज काही शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाचा रोजगार म्हणून स्वीकार केला आहे आणि त्यांना उत्पन्नही चांगल्या प्रमाणात मिळत आहे. कारण, ज्या शेतकऱ्याचे पर्यटन केंद्र आहे, अशा केंद्राला पर्यटक
आवर्जून भेटी देतात, अशा वेळी शेतकरी त्यांची राहण्या-खाण्याची सोय करतो. त्यांना गावाची ओळख करून देतो, त्या गावात जर एखादे ऐतिहासिक ठिकाण असेल,
तर त्यांची माहिती देतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. काही पर्यटक जर गावात आले, तर १० किलो गहू घेऊन जातात यामुळे शेतकऱ्यांचा थेट माल विकला जातो. यामुळे शेतकऱ्यास जशास तसे पैसे मिळतात. काही हौशी शहरी भागातील पर्यटक शेतकऱ्याच्या पर्यटन केंद्राला आवर्जून भेट देतात.
>कृषीक्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी संयुक्त राष्ट्र व्यवसाय परिषदेने २०११ मध्ये १६ मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा करावा, अशी मान्यता दिली.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच जाहीर केले आहे की, प्रत्येक शाळेतील ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना किमान १ दिवसासाठी कृषी पर्यटन केंद्राला सहल म्हणून भेट देणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे मुलांना शेतीची माहिती मिळेल आणि ग्रामीण भागाचीदेखील ओळख होईल.
२००४ मध्ये बारामतीमध्ये पहिले कृषी पर्यटन केंद्र स्थापन झाले आहे आणि त्यानंतर आज महाराष्ट्रातल्या ३३ जिल्ह्यांत कृषी पर्यटन केंद्राची स्थापना झाली आहे.
१ एप्रिल २०१५ ते ३० मार्च २०१६ या एका आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या ३२२ कृषी पर्यटन केंद्राना ७ लाख ६८ हजार पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. त्यामधून या शेतकऱ्यांना १८ कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न या पर्यटनाच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे. याचबरोबर शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीला शेतीवर शाश्वत रोजगारही उपलब्ध झाला आहे.
हल्लीच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतात पिकलेल्या मालाला योग्य किंमत मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, पर्यायी काही शेतकऱ्यांना अपुऱ्या उत्पन्नाअभावी आत्महत्या कराव्या लागत आहे. यासाठी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनाचा रोजगार म्हणून स्वीकार करावा. त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्यास नक्कीच मदत होईल.
- पांडुरंग तावरे, कृषी पर्यटन विकास संस्था विक्री व विपणनचे संचालक

Web Title: The village lost due to agricultural tourism ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.