गाव तसं चांगलं... तब्बल ४२७ घरे महिलांच्या नावावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 07:54 PM2019-01-04T19:54:32+5:302019-01-04T19:56:13+5:30
घरांच्या सातबारा उताऱ्यावर महिलांची नावे लावण्याचा ग्रामपंचायतीने चांगला निर्णय घेतला.
वडगाव मावळ : कान्हे ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यानंतर जांभूळ-सांगवी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. नऊ वर्षात जांभूळ ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात मावळ तालुक्यात प्रथम व जिल्हात तृतीय क्रमांक पटकविला. महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेत प्रथम क्रमांक मिळविला आणि आदर्श सरपंच व आयएसओ प्रमाणपत्र मिळविले. त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत तब्बल ४२७ घरे पुरुषांबरोबर महिलांच्या नावावर करून आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.
कान्हे, जांभूळ, सांगवी आणि नायगाव या गावांसाठी गेल्या ५० वर्षांपासून कान्हे ग्रामपंचायतीत होती. मात्र कालांतराने या गावांची लोकसंख्या वाढली. विकासासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीची गरज भासू लागली. त्यासाठी जांभूळचे तत्कालीन सरपंच संतोष जांभूळकर व त्यांच्या सहकाऱ्यांसह ग्रामस्थांनी प्रयत्न केले. त्यातून तीन आॅगस्ट २००९ रोजी कान्हे ग्रामपंचायतीचे विभाजन करून जांभूळ व सांगवी गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. तेव्हापासून नऊ वर्षांत ग्रामपंचायतीने पाणी योजना, शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, रस्ते व विविध प्रकारची कोट्यवधींची विकासकामे केली. गावाचा कायापालट केल्याने वेगवेगळे पुरस्कार मिळाले. त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत पतीबरोबर महिलांच्या नावावर घरे केली. गावातील सर्व घरांना एकाच प्रकारचा रंग दिला.
....................
विकासकामात राजकारण नाही
तालुक्यातील आयएसओ होणारी पहिली ग्रामपंचायत जांभूळ असून, त्याचबरोबर बालवाडी, शाळादेखील आयएसओ झाल्या आहेत. माजी आदर्श सरपंच संतोष जांभूळ, मीना जांभूळकर, विद्यमान सरपंच अश्विनी ओव्हाळ, उपसरपंच अंकुश काकरे, सदस्य दत्ता जांभूळ, चंद्रकांत औव्हाळ, नंदा गराडे, मनिषा लालगुडे, रखमाबाई पवार यांच्यासह माजी सदस्यांनी एकत्र येऊन आत्तापर्यंत सुमारे दहा कोटींची विकासकामे केली आहेत.
विद्यमान सरपंच अश्विनी औव्हाळ व माजी सरपंच मीना जांभूळकर म्हणाल्या, घरांच्या सातबारा उताऱ्यावर महिलांची नावे लावण्याचा ग्रामपंचायतीने चांगला निर्णय घेतला. यामुळे महिलांचे हक्क व अधिकार अबाधित राहून घरामध्ये सन्मानाची वागणूक मिळू शकते. पत्नीच्या सहीशिवाय पतीला काहीच करता येणार नाही. हा आदर्श दुसऱ्या ग्रामपंचायतींनी घ्यावा.