... शेवटी काय तर तुम्ही आहे म्हणून गाव आहे, तेवढं फक्त मतदानाला गावाकडे या!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 02:52 PM2020-12-19T14:52:09+5:302020-12-19T14:53:43+5:30
आमचा तुम्हाला गावाकडे यायला विरोध नव्हता. पण काही शहाणी लोक आहेत, तेच विरोध करत होते...
तेजस टवलारकर -
पिंपरी : मताला गावाकडे या, असे फोन गावाकडून येण्यास सुरुवात झाली आहे. आता आम्ही गावाकडे आलो तर चालेल का, असा प्रश्न शहरवासीयांनी विचारला तर अहो, आमचा तुम्हाला गावाकडे यायला विरोध नव्हता. पण काही शहाणी लोक आहेत, तेच विरोध करीत होते. शेवटी तुम्ही आहे म्हणून गाव आहे, अशी मनधरणी इच्छुकांकडून ग्रामपंचायती निवडणुकीत होत आहे.
मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तेव्हा कोरोनाच्या भीतीने गावांमध्ये बाहेरील व्यक्तींना गावबंदी करण्यात आली होती. आता ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे गावातील नेत्यांना शहरी मतदारांची आठवण झाली आहे.
मावळातील ५७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रोजगारासाठी गावातील अनेक नागरिक पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, या शहरांत गेले आहेत. अशा मतदारांना फोन करून, मेसेज करून निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन इच्छुक उमेदवार करीत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार हे तुलनेने कमी असतात. निवडणुकीत सर्वच स्थानिक उमेदवार उभे असतात. ग्रामपंचायत निवडणूक ही नेहमीच अटीतटीचे होती. यामुळे प्रत्येक मतदाराला विशेष महत्त्व असते.
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार पॅनलच्या माध्यमातून निवडणुका लढवित असतात.
इच्छुक उमेदवारांकडून पॅनल उभे करण्याची तयारी सुरू आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने प्रशासक नेमण्याची वेळ आली होती. यावरून ग्रामीण भागातील राजकारण तापले होते. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
--
सुरुवातीला होती गावबंदी
अनेक गावांमध्ये कोरोनाच्या भीतीने बाहेरील व्यक्तींना गावबंदी करण्यात आली होती. ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर कुंपण करून, बांबूचे अडथळे तयार करून किंवा दगड ठेवून गावचा रस्ता अडवून धरला होता. काही गावांच्या वेशीवर गावातील लोक आळीपाळीने पहारा देत होते. गावात बाहेरील व्यक्तीला येऊ दिले जात नव्हते. त्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण तेच कार्यकर्ते शहरी मतदारांना गावाकडे या, असा आग्रह करीत आहेत.
---