वाल्हेकरवाडीत, फुगेवाडीत हिंसक घटना; चिखलीत दुकाने बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 06:11 PM2018-07-29T18:11:06+5:302018-07-29T18:12:43+5:30
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगावात आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेच्यावेळी टोळक्याने वाल्हेकरवाडी भागात आठ ते दहा दुकानांवर दगडफेक केली.
पिंपरी : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगावात आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेच्यावेळी टोळक्याने वाल्हेकरवाडी भागात आठ ते दहा दुकानांवर दगडफेक केली. तसेच फुगेवाडी परिसरात पीएमपी बसवर दगडफेक करण्यात आली. या दोन्ही घटना रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडल्या. चिखलीत दुकाने बंद ठेवण्यात आली.
रविवारी सकाळपासूनच सोशल मिडियावरून पिंपरी चिंचवड बंद असल्याचे मेसेज व्हायरल झाले होते. तसेच मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगावात मराठा समाजाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात आठ ते दहा दुकानांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेमध्ये बँकेच्या एमटीएमचे आणि कंपनीच्या शोरूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फुगेवाडीत पीएमपी बसवर दगडफेक करण्यात आली. रविवार सुट्टीच्या दिवशी अचानकपणे झालेल्या या दोन हिंसक घटनांमुळे शहरात असुरक्षिततेचे वातावरण आहे. या घटनांमुळे शहरात विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.