वर्षातच ‘फेस्टिव्हल’वर ‘विघ्न’; महापालिकेचा उत्सव यंदा नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 01:04 AM2018-09-15T01:04:56+5:302018-09-15T01:05:28+5:30
संस्कृती व सांस्कृतिक रक्षक भाजपाला पडला विसर
पिंपरी : महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हलचे गतवर्षी पुनरुज्जीवन केले. सोळा वर्षांनंतर पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल या नावाने नव्याने उत्सव सुरू झाला. मात्र, संस्कृती आणि सांस्कृतिक रक्षणाचे गोडवे गाणाऱ्या महापालिकेत वर्षभरातच फेस्टिव्हल गुंडाळला आहे. यंदाचे उत्सवाचे कोणतेही नियोजन केले नसल्याने सर्वच स्तरांतून टीका होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर आर. एस. कुमार यांच्या कालखंडात १९९६ मध्ये पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिव्हल सुरू केला होता. या अंतर्गत लोकसंगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत होते. हा महोत्सव निगडी प्राधिकरण, चिंचवड, पिंपरी, भोसरी अशा विविध ठिकाणी होत असे. स्वरभास्कर भारतरत्न भीमसेन जोशी, उदित नारायण, सोनू निगम, साधना सरगम अशा विविध मान्यवर कलावंतांचा कलाविष्कार शहरवासीयांना अनुभवयास मिळाला. तसेच सुरेखा पुणेकर यांच्या लावणीनेही बहार आणली होता. पुढे प्रकाश रेवाळे महापौर असताना गणेश फेस्टिव्हल बंद केला.
त्यानंतर एक वर्ष पिंपरी-चिंचवड उत्सव, सांस्कृतिक संस्था आणि पालिकेच्या सहकार्याने एक वर्ष महोत्सव झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड सोशल क्लबच्या वतीने २०१३ पर्यंत महोत्सव होत होता.
या महोत्सवाचे गेल्या वर्षी पुनरुज्जीवन महापौर नितीन
काळजे यांनी केले होते. महापालिकेच्या वतीने एक ते तीन सप्टेंबरला पिंपरी-गणेश फेस्टिव्हल झाला होता. या फेस्टिव्हलमधून महाराष्ट्रीय लोककला आणि शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळाली होती.
नव्या महापौरांना नाही माहिती
नितीन काळजे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर हा उत्सव वर्षभरातच बंद पडला आहे. गेल्या वर्षी हा महोत्सव आयोजित करणारे पदाधिकारी या वर्षी नसल्याने कोणालाही महोत्सवाची आठवण झालेली नाही. संस्कृती आणि सांस्कृतिक रक्षणाचे गोडवे गाणाºया भाजपाच्या नेत्यांना आणि महापालिकेतील पदाधिकाºयांना विसर पडला आहे. विद्यमान महापौर राहुल जाधव यांनाही महोत्सवाबाबत काहीही माहिती नसल्याचे दिसून आले.
पिंपरी-चिंचवड फेस्टिव्हल या शहराची सांस्कृतिक ओळख करणारा उत्सव होता. त्यातून गणेशभक्तांचे मनोरंजन व्हावे, हाच उद्देश होता. त्यासाठी गेल्या वर्षी महोत्सवाची खंडित परंपरा सुरू केली. गेल्या वर्षी तीन दिवसीय फेस्टिव्हल झाला. ही परंपरा कायम ठेवावी,अशी सूचना केली होती. पद सोडल्यानंतर एकाच वर्षात महोत्सव बंद करणे ही चांगली गोष्ट नाही.
- नितीन काळजे, माजी महापौर