रुपीनगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 18:07 IST2019-03-19T18:06:51+5:302019-03-19T18:07:11+5:30
तळवडेतील रुपीनगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपीनगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी
पिंपरी : तळवडेतील रुपीनगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद वसंत भालेकर (वय ३३, रा. सप्तश्रृंगी हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर चव्हाण, वैभव वसंत चांदे, शुभम हनुमंत सरवदे, आकाश वसंत सरोदे, प्रतिक माणिक माने, रितेश वासुदेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १९ फेबु्रवारीला शिवजयंती मिरवणुकीत शरद भालेकर यांचे मित्र ईश्वर भिलारे यांच्याबरोबर नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरुन वादविवाद झाला होता. याचा राग मनात धरुन यातील आरोपी सागर चव्हाण याने रविवारी रात्री आठच्या सुमारास साथीदारांना बोलावून घेत भालेकर हे त्यांच्या घरासमोर बसलेले असताना त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या गळयातील ९५ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी हिसकाविली. त्यानंतर भालेकर यांना लाकडी दांडक्याने व कोयत्याने मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तर सागर शंकर चव्हाण (वय ३०, रा. विकास हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शरद भालेकर (रा. सप्तश्रृंगी हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे), योगेश भुजबळ, लक्ष्मण भालेकर (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास सागर चव्हाण हे त्यांचे मित्र शुभम हनुमंत सरोदे व अनिकेत गोडसे यांना मोटारीतून घेवून शुभम सरोदे यास त्याचे राहते घरी सोडविण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी शरद भालेकर याने चव्हाण यांच्या मोटारीवर दगड मारुन काच फोडली. तसेच कोयत्याने चव्हाण यांच्यावर वार केल्याने ते जखमी झाले. त्यावेळी चव्हाण यांचे मित्र शुभम सरोदे व अनिकेत गोडसे हे शरद भालेकर याला अडविण्यासाठी गेले असताना आरोपी योगेश भुजबळ व लक्ष्मण भालेकर यांनी लाकडी दांडक्याने सरोदे व गोडसे यांना मारहाण करीत मोटारीवर दगडफेक करीत मोटारीच्या काचा फोडल्या. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.