पिंपरीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; सहा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 01:39 PM2021-03-31T13:39:44+5:302021-03-31T13:40:08+5:30
फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पिंपरी : दोन गटांमध्ये वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली. यात लोखंडी रॉड, दांडके, फायटरने मारहाण केली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी येथे सोमवारी (दि. २९) रात्री ही घटना घडली.
पहिल्या प्रकरणात अनिकेत अनिल जाधव (वय १९, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ३०) फिर्याद दिली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल रणखांबे, आकाश रणखांबे, संजय कांबळे, दीपक जावळे, इश्वर कांबळे, अजय लोंढे (सर्व रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यासह बाळा कांबळे आणि बाळा जावळे (दोन्ही रा. विठ्ठलनगर, पिंपरी) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र रोहित शिंदे हे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दारू पित होते. त्यावेळी फिर्यादीला जिवे मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी जबर जखमी झाले.
दुसऱ्या प्रकरणात आकाश युवराज रणखांबे (वय २६, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) याने मंगळवारी (दि. ३०) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत अनिल जाधव, सुशांत अनिल जाधव, रोहित शिंदे, टॉकनचा भाऊ (सर्व रा. विठ्ठलनगर, पिंपरी), आतुल डोंगरे (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) व त्यांचे साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रोहित शिंदे याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे चुलते विष्णू मुंजाजी रणखांबे यांच्या घरी जेवण करायला जात होते. त्यावेळी आरोपी अनिकेत जाधव व रोहित शिंदे यांनी फिर्यादीला लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीचा भाऊ त्यांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात घेऊन गेला असता आरोपींनी विशाल रणखांबे याला वायसीएम हॉस्पिटलमध्ये फायटरने मारहाण करून जबर जखमी केले. फिर्यादीचे मामा संजय बाबूराव कांबळे हे फिर्यादीला भेटायला हॉस्पिटलमध्ये येत असताना आरोपींनी त्यांनाही फायटरने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.