भर पावसातील सभेत विश्वंभर चौधरींनी सरकारला ‘धुतले’
By नारायण बडगुजर | Published: January 6, 2024 10:10 PM2024-01-06T22:10:55+5:302024-01-06T22:16:38+5:30
पिंपरीतील सभेत अवकाळीमुळे भिजलेल्या नागरिकांकडून घोषणांचा पाऊस
पिंपरी : ‘‘पावसात चाललेल्या सभांचे निकाल नंतर चांगले येतात’’, असे म्हणत विचारवंत डाॅ. विश्वंभर चौधरी यांनी स्वत: १५ मिनिटे झालेल्या भर पावसात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर मोठी टीका करत धुतले. तर ज्या खुर्च्यांवर नागरिक बसले होते त्याच खुर्च्या डोक्यावर धरून भर पावसात त्यांनी भाषण ऐकले. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे अवकाळी पावसात झालेली ही सभा गाजली.
निर्भय बनो आंदोलन, इंडिया आघाडी पिंपरी-चिंचवड शहर सर्व घटक पक्ष व सामाजिक संस्था संघटना व कार्यकर्ते यांच्यातर्फे शनिवारी पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ‘निर्भय बनो’ सभा झाली. त्यावेळी डाॅ. विश्वंभर चौधरी बोलत होते. मानव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कायदे तज्ज्ञ ॲड. असीम सरोदे, उत्पल वनिता बाबुराव, मारुती भापकर आदी उपस्थित होते.
डाॅ. विश्वंभर चौधरी म्हणाले, ‘‘निवडणुकीमुळे हे वर्ष महत्त्वपूर्ण आहे. आपण सजग राहून मतदान केले पाहिजे. राजकारणातील दुष्ट प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आहे. राजकीय पक्ष, व्यवस्था त्यांच्या पद्धतीने लढत आहेत. मात्र, ‘आम्ही भारताचे लोक’ या नात्याने आपण पुढे आले पाहिजे. त्यासाठी ‘निर्भय बनो’ सभा घेण्यात येत आहेत. सिन्नर येथील सभेत माझ्यावर हल्ला झाला. यातील हल्लेखोरांची नावे मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली. मात्र, त्यांनी कारवाई केली नाही. काही मोजक्याच उद्योजकांच्या भांडवलावर भाजपाचे सरकार चालत आहे.
हिंदूंना मारणारे हिंदू व्हायचे नाही
रामनवमीला डीजे कशाला पाहिजे, असे मी म्हणालो, त्यामुळे माझ्यावर सिन्नरच्या सभेत हल्ला झाला. हे हिंदूवादी आहेत की डीजेवादी आहेत, हेच त्यांना कळलेले नाही. मी हिंदू आहे पण नथूरामाचा हिंदू नव्हे तर गांधीजींचा हिंदू आहे. महात्मा गांधी हे हिंदू होते. तरीही त्यांना नथूराम गोडसेने मारले. पानसरे, दाभोळकर, गौरी लंकेश, कलबुर्गी हे देखील हिंदूच होते. हिंदूंना मारणारे हिंदू आम्हाला व्हायचे नाही, असे विश्वंभर चौधरी म्हणाले.
सावरकर, जिनांचे शत्रू गांधी होते
हिंदू महासभेने मुस्लिम लिगबरोबर युती करून प्रांतिक निवडणुका लढवलेल्या आहेत. त्यांचा शत्रू गांधीजी होते. तसेच सावकर व जिना यांचेही शत्रू गांधीजी होते. रामनवमीला राम मंदिराचे उद्घाटन करता आले असते. मात्र, निवडणुकांमुळे ते लवकर केले जात आहे. यातील राजकीय स्वार्थाला आमचा विरोध आहे, असे देखील विश्वंभर चौधरी म्हणाले.
पावसातही झोडपून काढले
सभेदरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. १५ मिनिटे सुरू असलेल्या या पावसात खुर्च्या डोक्यावर घेऊन नागरिकांनी विचारवंत डाॅ. विश्वास चौधरी यांचे भाषण ऐकले. यावेळी चौधरी यांनी राज्यातील महायुती सरकार व केंद्रातील भाजपा सरकार यांच्यावर टीका केली.