शेतकरी दिनानिमित्त शिवार भेट
By admin | Published: August 31, 2015 03:58 AM2015-08-31T03:58:44+5:302015-08-31T03:58:44+5:30
मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने दुसरा शेतकरीदिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शेतकरी दिनानिमित्त शिवार भेट, पिकांवरील
गहुंजे/कामशेत : मावळ तालुका कृषी विभागाच्या वतीने दुसरा शेतकरीदिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शेतकरी दिनानिमित्त शिवार भेट, पिकांवरील कीड नियंत्रणाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तसेच प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
गेल्या वर्षी झालेल्या शासन निर्णयानुसार पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकरी म्हणून शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरीव कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून २९ आॅगस्ट हा दिवस प्रतिवर्षी ह्यशेतकरी दिनह्ण म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार मावळ कृषी विभागाकडून शेतकरीदिन साजरा करण्यात येत आहे. पद्मश्री विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. नरेंद्र काशीद, तालुका कृषी अधिकारी विनायक कोथिंबिरे व उपस्थित दोन शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रगतिशील शेतकरी बजाबा मालपोटे (रा. फळणे), तसेच भरत मांडेकर (रा. आंबी) यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना भातपिकावरील कीड व रोग नियंत्रित ठेवण्याबाबत वडगाव मावळ येथील भात संशोधन केंद्रातील प्रमुख डॉ. नरेंद्र काशीद यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘भातपिकाचे किडीपासून मोठे नुकसान होते. काही मोजक्या किडीपासून तीस टक्के घट होऊ शकते. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने कीटकनाशके वापरावीत. किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सल्ला घ्यावा.’’ कार्यक्रमाला शेतकरी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)