विठ्ठलाच्या पादुका पोहोचणार लंडनमध्ये; देहूमध्ये जल्लोषात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 18:38 IST2025-04-16T18:37:17+5:302025-04-16T18:38:17+5:30
त्या पंढरपूर येथून देहू येथे मंगळवारी आणण्यात आल्या. त्यानंतर त्या चीनमार्गे २२ देशात नेण्यात येणार आहेत.

विठ्ठलाच्या पादुका पोहोचणार लंडनमध्ये; देहूमध्ये जल्लोषात स्वागत
देहूगाव : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर लंडनमध्ये साकारले जाणार आहे. त्याची सुरुवात विठ्ठलाच्या पाऊलखुणांनी व्हावी, यासाठी खास पादुका तयार करण्यात आल्या आहेत. या पादुका पंढरपूर येथे विठ्ठलाच्या चरणी स्पर्श करून देहू येथे आणण्यात आल्या. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर लंडनमध्ये उभारण्यासाठी तेथे स्थायिक झालेल्या आणि मूळचे भारतीय असणाऱ्या नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.
याबाबत माहिती देताना यूएसओ वारकरी संस्थेचे संस्थापक अनिकेत महाराज मोरे म्हणाले, अनिल खेडकर यांची लंडनमध्ये मंदिर उभारण्याची संकल्पना आहे. या कार्याची सुरुवात विठ्ठलाच्या पाऊलखुणांनी व्हावी, अशी तेथील नागरिकांची होती. त्यासाठी पादुका तयार करण्यात आल्या आहेत. त्या पंढरपूर येथून देहू येथे मंगळवारी आणण्यात आल्या. त्यानंतर त्या चीनमार्गे २२ देशात नेण्यात येणार आहेत.
या मंदिराचा तीनशे कोटींचा आराखडा आहे. या सोहळ्यामध्ये जगभरातील वारकरी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील वारकरी भाविकभक्त एकत्र येत इंग्लंडमध्ये भव्य दिव्य स्वरूपात श्री विठ्ठल मंदिर उभारणार आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने श्री विठ्ठलाच्या पादुकांचे टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, बाजी दरडे व अन्य भाविकभक्त उपस्थित होते.