‘एचए’मध्ये स्वेच्छानिवृत्ती?
By admin | Published: May 1, 2017 02:54 AM2017-05-01T02:54:44+5:302017-05-01T02:54:44+5:30
आर्थिक संकटात असलेल्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत
पिंपरी : आर्थिक संकटात असलेल्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्स (एचए) कंपनीला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशातच कामगारकपातीचे धोरण राबविण्यासाठीही स्वेच्छानिवृत्ती लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
सध्या कंपनीतील कामगार संख्या अधिक असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यासाठी कामगारकपात धोरण राबविण्याचे जवळपास निश्चित झाले असून, त्याअंतर्गत स्वेच्छानिवृत्ती लागू करण्यात येणार आहे. या योजनेचा किती कामगार लाभ घेतात, याची चाचपणी करून उर्वरित कामगारांमध्ये कंपनी चालविण्याचे सरकारचे नियोजन आहे. कामगारांच्या थकीत वेतनापोटी सरकारने १०० कोटी रुपये दिले आहेत. तसेच कंपनी पूर्णत: सुरू करण्यासह बँका व शासकीय देणी फेडण्यासाठी कंपनीला जमीन विकावी लागणार आहे.
सध्या कंपनीचे ११०० कामगार आहेत. त्यातील सुमारे ४०० कामगारांचा सेवाकाळ पाच वर्षांहून कमी राहिलेला आहे. हे कामगार स्वेच्छानिवृत्ती योजनेचा लाभ घेतील, असा अंदाज आहे. मात्र, व्यवस्थापनाकडून अद्याप कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. (प्रतिनिधी)
कंपनीतील कामगारांच्या पगारापोटी केंद्राकडून शंभर कोटी मिळाले आहेत. तसेच कंपनी पूर्णत: सुरू करण्यासाठी जागा विक्री केली जाणार असून, त्यातून कंपनी पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न आहे. स्वेच्छानिवृत्ती ही योजना अद्याप लागू केलेली नाही.
- श्रीरंग बारणे, खासदार,
अध्यक्ष, एचए मजदूर संघ.