राष्ट्रवादीच्या विकासाला मत द्या
By admin | Published: February 15, 2017 02:08 AM2017-02-15T02:08:07+5:302017-02-15T02:08:07+5:30
पिंपरी-चिंचवडचा विकास हा राष्ट्रवादी कॉँग्रेसने केला आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री यांनी शहरासाठी २ हजार कोटी निधी उपलब्ध
पिंपरी : पिंपरी-चिंचवडचा विकास हा राष्ट्रवादी कॉँग्रेसने केला आहे. त्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री यांनी शहरासाठी २ हजार कोटी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे शहराचा कमी कालावधीत कायापालट झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहराशी कोणतेही शहर स्पर्धा करू शकत नाही, असे मत माजी कामगारमंत्री शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
प्र्रभाग क्र. १७ चे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब भोईर, राजेंद्र साळुंखे, आशाताई सूर्यवंशी, शोभाताई वाल्हेकर यांची प्रचार सभा झाली. त्या वेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे बोलत होते. भाऊसाहेब भोईर यांनी प्रास्ताविक केले.यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे आदी उपस्थित होते.
शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी कॉँग्रेसने विकासाचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे भाऊसाहेब भोईर सत्ताधारी पक्षाच्या मागे न जाता ९ नगरसेवकांबरोबर राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपा-शिवसेना एकीकडे एकमेकांची औकात काढत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेसाठी राष्ट्रवादीतून बाहेर पडणाऱ्या नगरसेवकांची संख्या अधिक होती. अशा वेळी केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या मागे न लागता भाऊसाहेब भोईरांचा गट राष्ट्रवादीत आला.
सत्तेपेक्षा त्यांनी विकासाला साथ दिली आहे. त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारण आणि नाट्य, चित्रपट अशा कलाक्षेत्रातही योगदान दिले आहे.’’ संतोष पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)