विकासासाठी शिवसेनेला मत द्या
By admin | Published: February 15, 2017 02:07 AM2017-02-15T02:07:43+5:302017-02-15T02:07:43+5:30
थेरगाव परिसराचा विकास कोणी केला हे सर्वांना माहिती आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला साथ द्या, असे आवाहन
पिंपरी : थेरगाव परिसराचा विकास कोणी केला हे सर्वांना माहिती आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला साथ द्या, असे आवाहन खासदार श्रीरंग ऊर्फ अप्पा बारणे यांनी केले.
थेरगाव प्रभाग क्रमांक २४ चे शिवसेनेचे उमेदवार शालिनी कांतीलाल गुजर, नीलेश बारणे, सचिन भोसले, दीपाली गुजर यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी खासदार बारणे सहभागी झाले होते. ‘खिच के तान धनुष्यबाण’ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. या फेरीत मोठ्या प्रमाणावर तरुण महिला सहभागी झाल्या होत्या.
खासदार बारणे म्हणाले, ‘‘शिवसेनेकडे विकासाची दृष्टी आहे. आम्ही केवळ आश्वासने देत नाहीत, तर ती आश्वासने पाळतो. अनधिकृत बांधकामे असो किंवा शास्तीकर असो, जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना आग्रही राहिलेली आहे. आंदोलने केली आहेत. प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवारांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि योगदान वाखाणण्यासारखे आहे. त्यामुळे विकासासाठी शिवसेनेला साथ द्या.’’
प्रेरणा बँकेचे संस्थापक तुकारामभाऊ गुजर म्हणाले, ‘‘खासदार अप्पा बारणे यांच्या नेतृत्वाखाली थेरगाव परिसराचा विकास झाला आहे. मी शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. आमच्या कुटुंबाचे योगदान सर्वजण जाणताच आहात. सूनबाई शालिनी गुजर निवडणूक रिंगणात आहेत. आम्हाला काम करण्याची संधी जनतेने द्यावी. तसेच शहराच्या राजकारणात अग्रभागी असणाऱ्या कुटुंबातील नीलेश बारणे आहेत. सचिन भोसले हे वकील, तर दीपाली गुजर यांचे कुटुंब समाजकारणात अग्रणी असते. चारही उमेदवार चांगले आहेत. विकासासाठी शिवसेनेला मतदान करायला हवे.’’
(प्रतिनिधी)