मतदार यादीचा ‘चेहरा’ झाला सुस्पष्ट
By admin | Published: October 7, 2014 06:51 AM2014-10-07T06:51:15+5:302014-10-07T06:51:15+5:30
मतदार यादीमध्ये छायाचित्र समाविष्ट करण्याच्या आवाहनाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के मतदारांचे छायाचित्र
पुणे : मतदार यादीमध्ये छायाचित्र समाविष्ट करण्याच्या आवाहनाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत समाविष्ट करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. लोकसभा निवडणुकीत हेच प्रमाण ८८ टक्के होते. मतदारांचा चेहरा स्पष्ट होणार असल्याने बोगस मतदानाला आळा बसणार आहे. मतदार यादीत छायाचित्र देण्यात ग्रामीण भागातील नागरिकांनी तत्परता दाखविली असून, शहरी मतदार मात्र त्याबाबत तुलनेने उदासीन असल्याचे
दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील किमान ९२ टक्के मतदारांचे फोटो मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार मतदारांनी मतदार यादीत फोटो समाविष्ट करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. जिल्ह्यातील ६९ लाख २७ हजार ३७९ मतदारांपैकी ६० लाख ८८ हजार २३२ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत आहे. जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही ७ लाख ३२ हजार मतदारांनी छायाचित्राची पूर्तता केलेली नाही. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदार अधिक सुज्ञ ठरले आहेत. ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघामध्ये ९६ टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे छायाचित्र आहे. तर शहरी भागातील मतदारसंघात सरासरी ८० टक्के मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र आहे. बारामती मतदारसंघात सर्वाधिक ९९.८६ टक्के मतदारांनी छायाचित्राची पूर्तता केली आहे. तर पिंपरी मतदारसंघात केवळ ७४ टक्के मतदारांनी आपले छायाचित्र देणे पसंत केले आहे.