काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, स्टाईल मारणाऱ्याला नव्हे : आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 03:17 PM2019-04-25T15:17:42+5:302019-04-25T15:42:25+5:30
प्रत्येक वर्षी विचार बदलणारे आणि स्थिर मन नसणाऱ्यांशी युती होणार नाही. स्थिरमनाशी युती होईल, मनसेशी नाही.
पिंपरी : काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, स्टाईल मारणाऱ्याला नव्हे. पॉप्युलरपेक्षा परफॉरर्मिंग असायला हवे. कामातून माणूस ओळखला जावा, असे मत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड मधील तरुणाईंशी 'आदित्य संवाद' मध्ये व्यक्त केले. तसेच राजकारण, शिक्षण, राष्ट्रीय सुरक्षितता, बेरोजगारी असे युवकांचे सामाजिक प्रश्न जाणून घेतले. तरूणाईच्या प्रश्नांना ठाकरे यांनी वाट मोकळी करून दिली.
पिंपरीतील चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मागील मैदानात आदित्य संवाद झाला. तरूणांच्या आशा आकांक्षा जाणून घेतल्या. तरुणाईंच्या चौफेर प्रश्नांना उत्तरे दिली. राज्यात सुरू झालेल्या आदित्य संवाद या कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी सुधीर कावे, किर्ती काळे, अक्षय डोईफोडे, निलेश पिंगळे, महेंद्र चव्हाण, श्याम सुतार, ऋषभ म्हात्रे, ऋणाली देसाई, स्रेहा गोडसे, सचिन लांबुटे, रेश्मा चौधरी, सूरज म्हसे, राखी मल्या, योगेश शहा यांनी राजकारण, राजकीय नेता कसा असावा, शिक्षण, समाजकारण, राष्ट्रीय सुरक्षितता, बेरोजगारी, रॅगीग, तरूणांचे प्रश्न असे विविध विषयांवर प्रश्न विचारले. खासदारांना का निवडूण द्यायचे या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, गल्लीतील प्रश्न सोडविणे हे खासदारांचे काम नसून देशपातळीवरील प्रश्न जाणून घेणे आवाज उठविणे हे काम असते. बेरोजगारीवर ठाकरे म्हणाले,हा प्रश्न गंभीर होत आहे. त्यावर उपाय करण्यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाची गरज आहे. तरूणींच्या सुरक्षिततेवर ठाकरे म्हणाले, कोणी त्रास देत असेल तर प्रतिकार करायला हवा. त्यासाठी युवासेना प्रयत्न करीत आहे.
.........................
स्थिर मनाशी युती
मनसेशी युती करणार का? या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, ध्येय, समविचारी आहेत, त्यांच्याशी युती आहे. अर्थात भाजपाशी. जनहितासाठी युती असावी. प्रत्येक वर्षी विचार बदलणारे आणि स्थिर मन नसणाऱ्यांशी युती होणार नाही. स्थिरमनाशी युती होईल, मनसेशी नाही.
.........................
ध्येयवेड्यांची स्वाक्षरी घेतली
यावेळी मुष्टियोद्धा महेद्र चव्हाण, दुर्ग सर करणारा साई कवडे यांच्याशी गप्पा मारल्या. संवाद साधून या ध्येयवेड्याची आदित्य संवाद या कॅपवर स्वाक्षरी ठाकरे यांनी घेतली.