मतदारांची नावे दुसऱ्या वॉर्डात
By admin | Published: January 6, 2017 06:32 AM2017-01-06T06:32:07+5:302017-01-06T06:32:07+5:30
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमधील मतदारांच्या याद्या मोशी आणि धावडेवस्ती प्रभागात जोडल्याचा आक्षेप भोसरीतील विविध पक्षीय नेत्यांनी घेतला आहे
पिंपरी : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठमधील मतदारांच्या याद्या मोशी आणि धावडेवस्ती प्रभागात जोडल्याचा आक्षेप भोसरीतील विविध पक्षीय नेत्यांनी घेतला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या निवडणूक विभागास पत्र दिले आहे. याद्या पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
प्रारूप प्रभागरचना केल्यानंतर प्रभागांनुसार मतदार याद्या तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. याद्यांचे अद्ययावतीकरण केल्यानंतर सूचना आणि हरकतींसाठी या भाग याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यावर भोसरी परिसरातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत हनुमंत लांडगे, तुषार सहाने, नीलेश मुटके, मयूर मडेगिरी, विकास भुंबे यांनी याबाबतची माहिती दिली. प्रभाग क्रमांक आठमध्ये इंद्रायणीनगर संतनगर, चिखली प्राधिकरण, बालाजीनगर, खंडेवस्ती, स्पाईन रस्ता पेठ क्रमांक एक ते तेरा, गणेशनगर, गवळीमाथा या भागांचा समावेश होतो. त्यातील जुना बोऱ्हाडेवस्तीचा भाग आणि प्रभाग आठचा काही भाग दुसऱ्या प्रभागाला जोडला आहे. त्यामुळे सुमारे १२ हजार मतदार दुसऱ्या भागास जोडले गेले आहेत. त्यामुळे या प्रभागाचे मतदार १७ हजारांवर आले आहेत. महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रत्यक्षपणे याद्यांची तपासणी न करता एका प्रभागातील भाग दुसऱ्या प्रभागास जोडला आहे. त्यामुळे निवडणूक विभागातील गलथान कारभाराचा प्रत्यय नागरिकांना आला आहे. (प्रतिनिधी)