मतदारांची संक्रांत गोड
By admin | Published: January 15, 2017 05:24 AM2017-01-15T05:24:59+5:302017-01-15T05:24:59+5:30
महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून शनिवारी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत इच्छुकांकडून घरोघरी खास ‘वाण’ देत संक्रांत गोड करण्यात आली.
पिंपरी : महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून शनिवारी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत इच्छुकांकडून घरोघरी खास ‘वाण’ देत संक्रांत गोड करण्यात आली.
महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्याचे निमित्त इच्छुकांकडून शोधले जात आहे. प्रत्येक उमेदवाराची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. वाढदिवसासह छोट्या-मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून इच्छुक मतदारांकडे जात आहेत. अशातच वेगवेगळ्या सणांचेही निमित्त साधले जात आहे. त्यामुळे इच्छुकांकडून शनिवारी सकाळपासूनच मकर संक्रांतीनिमित्त भेटवस्तू नागरिकांच्या घरी पोहोचल्या. भांड्यांचा सेट, चांदीचा करंडा, डिनर सेट, पर्स, गृहोपयोगी वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या. तिळगूळवाटपासह भेटवस्तू देण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू होती.
शनिवारी घरोघरी वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू पोहोचविण्याचा धडाका सुरू होता. काही ठिकाणी तर पहिली भेटवस्तू पोहोचती तोच दुसऱ्या एका इच्छुकाकडून वाण पोहोचविले जात होते.(प्रतिनिधी)
किमती वस्तू; महिला अवाक्
एरवी परिसरातील महिलांसह कुटुंबातील महिला यांच्यात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होतो. छोट्या वस्तू वाण म्हणून देत कार्यक्रम पार पडतो. मात्र, यंदाच्या वर्षी महापालिका निवडणूक असल्याने प्रभागातील इच्छुकांनी कार्यक्रमांचे आयोजन करीत विविध स्वरूपाचे अन् किमती वस्तू वाण म्हणून दिल्याने महिलाही अवाक् झाल्या.
- संक्रांतीनिमित्त देण्यात येणाऱ्या वस्तू पॅकिंग करून देण्यात येत होत्या. यावर इच्छुकांचे छायाचित्र यासह संक्रांतीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. कोणत्या प्रभागातून इच्छुक आहे. याबाबतचा प्रभाग क्रमांकही त्यावर नमूद असल्याचे दिसून आले.
- नागरिकांना भेटवस्तू देण्यासाठी इच्छुकांनी संबंधित भेटवस्तू दोन दिवसांपूर्वीच मागवून घेतल्या आहेत. यामुळे इच्छुकांची संपर्क कार्यालये भेटवस्तूंनी भरल्याचे चित्र दिसत होते. त्यानंतर शनिवारी सकाळपासूनच या वस्तू मतदारांपर्यंत पोहोचल्या. समोरचा इच्छुक कोणती वस्तू देणार, याचा अंदाज घेत त्यापेक्षाही दर्जेदार वस्तू देण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून होत होता. महिला इच्छुकांनी तर घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रचाराचा मुहूर्त साधला.
- निवडणुकीसाठी कमी अवधी शिल्लक असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांना कसरत करावी लागणार आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यही कामाला लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक सदस्याला परिसरनिहाय प्रचाराचे नियोजन दिले असून त्यानुसार मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. शनिवारी भेटवस्तू वाटपासाठीही इच्छुकांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यही प्रचारात उतरले होते.