कविसंमेलनातून मतदान जनजागृती
By admin | Published: February 17, 2017 04:45 AM2017-02-17T04:45:38+5:302017-02-17T04:45:38+5:30
साहित्य संवर्धन समिती आणि प्रतिभा इन्स्टिट्यूट आॅफ कॉमर्स यांच्या वतीने मतदान जनजागृती कविसंमेलन घेण्यात आले. कवी, कथाकार
पिंपरी : साहित्य संवर्धन समिती आणि प्रतिभा इन्स्टिट्यूट आॅफ कॉमर्स यांच्या वतीने मतदान जनजागृती कविसंमेलन घेण्यात आले. कवी, कथाकार व गझलकार राज अहेरराव यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. या वेळी कवी अनिल दीक्षित, साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक, सहायक आयुक्त अण्णा बोदाडे, रमेश भोसले, हास्यकवी नंदकुमार कांबळे, सुभाष चव्हाण व उमेश सणस आदी उपस्थित होते.
मतदानाचा हक्क प्राप्त झालेल्या दीपक विश्वकर्मा व उत्कर्षा यादव या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कवयित्री माधुरी विधाटे यांनी भारत माझा देश आहे. लोकशाही या देशाचा आत्मा आहे. लोकशाहीसाठी मतदान आवश्यक आहे. मतदान हा भारतीय संविधानातील आपला मूलभूत हक्क आहे. हा हक्क विचारपूर्वक बजावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क बजावण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. तसेच, सर्वांनी मतदान करावे यासाठी प्रयत्न करण्याचा माझा निर्धार आहे. ही मतदान प्रतिज्ञा सर्वांसाठी सामूहिकपणे म्हणून घेतली.
सहायक आयुक्त बोदाडे यांनी मतदान कसे करावे यासाठी मार्गदर्शन केले. अनिल दीक्षित, सुरेश कंक, शोभा जोशी, सविता इंगळे व वर्षा बालगोपाल आदी कवींनी प्रबोधनात्मक मतदान जनजागृतीपर कविता सादर केल्या. समितीचे सचिव सुहास घुमरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जयश्री मुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. रूपा शहा यांनी आभार मानले.
या वेळी लोकशाही पद्धतीचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. तसेच सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)