विवाहेच्छूंना प्रतीक्षा तुळशी विवाहाची, एक तारखेपासून उडणार लग्नाचे बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 06:43 AM2017-10-30T06:43:04+5:302017-10-30T06:43:36+5:30
दिवाळीनंतर अनेकांच्या घरी विवाहाचे वेध लागले आहेत. परंतु तुळशीविवाह झाल्यानंतरच लग्न करण्याची प्रथा आहे. त्यामुळे विवाहेच्छूंना एक तारखेपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
पिंपरी : दिवाळीनंतर अनेकांच्या घरी विवाहाचे वेध लागले आहेत. परंतु तुळशीविवाह झाल्यानंतरच लग्न करण्याची प्रथा आहे. त्यामुळे विवाहेच्छूंना एक तारखेपर्यंत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहास प्रारंभ होत आहे. या वर्षी दोन महिन्यांत विवाहाचे १२ मुहूर्त आहेत. लवकरच शहरात सनई-चौघड्याचे सूर कानी पडणार आहेत. विवाहेच्छू मुलांच्या कुटुंबीयांची प्रतीक्षा संपती आहे. मराठी महिन्यानुसार कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होत आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत विवाह पार पडतात. त्यानंतर विवाहेच्छूंच्या तारखा ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात अनेकांनी तुळशीविवाहापूर्वी साखरपुडा उरकून घेतला आहे. त्यामुळे लग्नाचे मुहूर्त ठरवून त्यानंतर मंगल कार्यालयाचे बुकिंग आणि लग्नाच्या खरेदीची लगबग शहरात पाहायला मिळणार आहे.
शहरातील पुरोहितांकडे आता सोईनुसार लग्नाची तारीख ठरवण्यासाठी वधू-वर पित्यांची रीघ लागली आहे. तुळशी विवाह तसेच लग्नाचा जवळचा मुहूर्त साधण्यासाठी गर्दी होत आहे. या वर्षी लग्नासाठी १२ मुहूर्त आहेत. नोव्हेंबर महिन्यात २१, २३, २४, २५, २८, २९ या तारखांना मुहूर्त आहे. डिसेंबर महिन्यात ३,४,१०, ११, १२ व १४ या तारखांना लग्नमुहूर्त आहेत. त्यामुळे एक तारखेपासून शहरात लग्नाचे बार उडत असल्याने विवाहेच्छूंमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.
जीएसटीमुळे अनेक वस्तू महागल्या आहेत. त्यामुळे लग्नासाठी वधू आणि वर यांचे नातेवाईक आखडता हात घेत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतही लग्नसराईसारखे वातावरण दिसत नाही.