मैैदानाची प्रतीक्षाच
By Admin | Published: July 4, 2017 03:44 AM2017-07-04T03:44:06+5:302017-07-04T03:44:06+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सांगवीतील एक मैदान वगळता अन्य ठिकाणी खेळाच्या मैदानांची उणीव आहे. सांगवी परिसरातील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगवी : सार्वजनिक बांधकाम विभागाचे सांगवीतील एक मैदान वगळता अन्य ठिकाणी खेळाच्या मैदानांची उणीव आहे. सांगवी परिसरातील खेळाच्या मैदानाच्या आरक्षित जागा गेल्या कोठे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. खेळाडू घडविणारी मैदानेच नसतील, तर शहर, राज्य आणि पुढे जागतिक पातळीवर खेळाडू पुढे कसे येतील?
चांगल्या दर्जाचे खेळाडू शहराचा लौकिक कसा वाढवतील, असा प्रश्न सांगवीतील नागरिकांना पडला आहे. सांगवी परिसरात असलेली मैदाने गेली कोठे असा प्रश्न असून, एकट्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर अवलंबून असलेल्या परिसरातील खेळाडूंना स्वतंत्र मैदान आणि खेळाचे साहित्य उपलब्ध व्हावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. सांगवी परिसरात महापालिकेकडून अद्याप कोणतेही सुसज्ज असे क्रीडांगण सुरू करण्यात आले नाही. ज्या जागेवर आरक्षण आहे तिचाही विकास प्रशासनाकडून अद्याप करण्यात आलेला नाही. खेळाडू तसेच विद्यार्थ्यांना पीडब्ल्यूडी विभागाच्या मोकळ्या जागेत खेळावे लागत आहे. स्मार्टसिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरात क्रीडांगणाची वाणवा असावी हे शहराच्या लौकिकेला शोभणारे नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
खेळाडूंची गैरसोय : राजकीय अनास्था
परिसरातील विद्यार्थी आणि खेळाडूंना सध्या सुविधांयुक्त असे मैदान असणे गरजेचे आहे. परंतु शासनाकडून आणि पालिकेकडून कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली जात नाहीत. राजकीय अनास्थेमुळे सांगवीत ही परिस्थिती आहे.
- मनोज सोनवणे, खेळ प्रशिक्षक
माझा मुलगा कबड्डी आणि मैदानी खेळात शाळेत अव्वल स्थानावर आहे. खेळाचे मैदान नसल्याने त्याला सरावासाठी जागा मिळत नाही. मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने खासगी क्रीडांगणावर मोठे शुल्क भरून पाठविणे परवडत नाही. महापालिकेने खेळाचे मैदान उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून या परिसरातील खेळाडूंची गैरसोय दूर होईल.’’
- प्रभाकर हिंगे, रहिवासी
खेळाडूंसाठी मैदान नसल्याने परिसरातील तरुणवर्ग नाराज आहे. जुनी सांगवीतील ममतानगरजवळील चार एकर जागा आरक्षित असून, ती उपयोगात न आणल्याने झाडे-झुडपे वाढली आहेत. सध्या ही जागा तशीच पडून आहे. जुनी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरात मैदानासाठी एकही जागा शिल्लक नाही. पीडब्ल्यूडीचे मैदान खेळाच्या मैदानासाठी किती दिवस पर्याय ठरणार आहे. - राजू साळवे, सचिव, मनसे, पिंपरी चिंचवड