पोलीस ठाण्याला हक्काच्या जागेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 03:04 AM2018-10-30T03:04:13+5:302018-10-30T03:04:38+5:30
महापालिकेच्या गाळ्यांमध्ये होते कामकाज; अधिकाऱ्यांनी केल्या काही सुधारणा
सांगवी : अनेक समस्यांमुळे सांगवी पोलीस ठाण्यात असुविधा होत्या. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत सांगवी पोलीस ठाण्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पोलीस ठाण्याने कात टाकली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील पोलीस ठाण्यांमधील विविध सुधारणांवर भर देण्यात येत आहे. विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नवी सांगवी व जुनी सांगवी असा सुमारे २५ चौरस किलोमीटरचा परिसर
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. पोलीस ठाण्यात मूलभूत सुविधा नव्हत्या. त्याची ‘लोकमत’ पाहणी करण्यात येऊन या समस्यांबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.
सांगवी पोलीस ठाण्यांतर्गत पिंपळे सौदागर, जुनी सांगवी, तसेच नवी सांगवी पोलीस चौकी अशा तीन पोलीस चौकी आहेत. त्यात १ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २ पोलीस निरीक्षक, ४ सहायक निरीक्षक, ६ उपनिरीक्षक, ११ सहायक उपनिरीक्षक, १७ हवालदार, ४० पोलीस नाईक,
४९ पोलीस शिपाई असा १३० पोलीस ताफा असलेल्या कर्मचाºयांमध्ये ३० महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी आहेत.
अंदाजे २५ चौरस किलोमीटर परिसरात सांगवी पोलीस ठाण्याची हद्द आहे. सांगवीत औंध हा सगळ्यात कमी अंतर, तर जगताप डेअरी,
पिंपळे सौदागर हा जास्त अंतर असलेला परिसर या पोलीस ठाण्यांतर्गत येतो. सांगवी पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर काही महिन्यांतच पोलीस ठाण्याचे रुपडे पालटण्यासाठी येथील पार्किंग परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले आहेत.
गैैरसोय : आठ गाळ्यांत विभागले कार्यालय
महापालिकेच्या व्यावसायिक आठ गाळ्यांत सांगवी पोलीस ठाण्याचे कामकाज चालते. १५० चौरस फुटांचा एक गाळा आहे. अशा आठ गाळ्यांमध्ये पोलिसांना काम करावे लागते. या ठाण्यासाठी स्वमालकीची जागा नाही. त्यामुळे अशा पद्धतीने कामकाज सुरू आहे. ठाण्याला हक्काची जागा उपलब्ध होईल, अशी येथील पोलिसांना प्रतीक्षा आहे.
नवीन पोलीस ठाण्याची मागणी
सांगवी पोलीस ठाण्यात आणखी मुनष्यबळाची गरज आहे. लोकसंख्येची घटना जास्त असल्याने या ठाण्यावर कामाचा ताण येत आहे. यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. पिंपळे निलख आणि पिंपळे गुरव भागासाठी नवीन पोलीस ठाण्यांची मागणी करण्यात येत आहे. पिंपळे गुरव व पिंपळे निलख हा परिसर मोठ्या लोकसंख्येचा असल्याने येथे पोलीस ठाणे असणे गरजेचे आहे. पिंपळे सौदागर येथे शिवार चौक अथवा कोकणे चौकात पोलीस ठाण्याची नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.
जप्त वाहने हलविली
वर्षानुवर्षे पडून असलेल्या जप्त वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ही सर्व वाहने येथून हटविण्यात आली आहेत. त्यामुळे हा परिसर स्वच्छ व शोभिवंत करण्यास जागा उपलब्ध झाली आहे. पार्किंगची जागा मोकळी जागा झाल्याने पोलीस ठाण्याची वाहने रस्त्यावर उभी न करता या पार्किंगमध्ये उभी करण्यात येतील. त्यामुळे या परिसरातील वाहतूककोंडीची समस्या सुटण्यासाठी मदत झाली आहे
स्टेशनमधील सुधारणा
पावसाळ्यात पाण्याची गळती थांबण्यासाठी केली उपाययोजना.
स्वच्छतागृहाची रंगरंगोटी
जप्त वाहने हलविल्याने प्रशस्त र्पाकिंग उपलब्ध झाले आहे.
तक्रारदार आणि नागरिकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
१५ आॅगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. पण गेल्या दहा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पोलीस ठाण्याला हक्काची जागा मिळत नाही. हा सांगवी पोलीस ठाण्यातील प्रश्न प्रलंबित आहे. याबाबत निर्णय होणे गरजेचे आहे.
सांगवी पोलीस ठाण्यामध्ये अनेक मूलभूत सुविधा व समस्या होत्या. टप्प्याटप्प्याने त्या लवकरच दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातील काही सुधारणा प्रत्यक्षात दिसून येत आहेत. नागरिक व प्रशासनाने यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा आहे.
- मोहन शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी