भीषण अपघाताची प्रशासन पाहतेय वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:52 AM2019-01-11T02:52:31+5:302019-01-11T02:52:48+5:30
टाकवे : इंद्रायणी नदीवरील पुलाचे कठडे तुटूनही दुर्लक्ष
वडगाव मावळ : टाकवे येथील इंद्रायणी नदीवरील पुलाला आठ दिवसांपूर्वी वाहनाची धडक बसल्याने पुलाचे कठडे तुटले आहेत. या पुलावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. दुरुस्ती न केल्याने पुन्हा अपघात होऊ शकतो. प्रशासन भीषण अपघात होण्याचीच वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. बांधकाम खात्याने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नदीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक बनला आहे. कोणत्याही क्षणी धोका होऊ शकतो. या बाबींचा विचार करून या पुलाची दुरुस्ती करावी किंवा नवीन पूल तातडीने उभारावा, अशी मागणी सेवा फाउंडेशनचे चंद्रकांत असवले, किरण भांगरे, तानाजी मोरे, मधू कोकाटे, संतोष जांभूळकर यांनी सहा महिन्यांपूर्वी बांधकाम खात्याकडे केली होती. त्यानंतर बांधकाम खात्याने काही दिवस तुटलेल्या ठिकाणी लाल कापड गुंडाळले होते. नंतर लोखंडी अॅँगल लावले. आठ दिवसांपूर्वी एका जीपचा ब्रेक फेल झाल्याने ती कठड्याला धडकली. नदीपात्रात पडता पडता वाचली. त्यामुळे पुन्हा पाइप तुटले आहे. प्रशासनाने यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात हा पूल धोकादायक असल्याची नोंद केली आहे. तरीदेखील दुरुस्तीसाठी किंवा नव्या पुलाच्या बांधकामासाठी अद्याप शासनाला जाग आली नाही. पूल कोसळल्यावर शासनाला जाग येणार का, असा सवाल फाउंडेशनच्या सदस्यांनी केला आहे. सावित्री नदी दुर्घटनेनंतर झालेल्या सर्वेक्षणात सर्वात अगोदर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे घोषित केले होते. त्याच सुमारास काही दिवस अवजड वाहतूक बंद केली होती. ती पुन्हा सुरू झाली आहे. या पुलावर रात्री अंधार असतो. त्यामुळे अपघात होऊन मोठी दुर्घटना घडू शकतो. त्यासाठी पुलावर पथदिवे बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परंतु या मागणीकडे प्रशासन कधी लक्ष देणार हे गुलदस्त्यातच आहे.
माहितीचा अधिकार : निधी मंजूर नाही
पुलाच्या दुरुस्तीसाठी अगर नवीन पुलाच्या बांधकामासाठी शासनाकडून किती निधी मंजूर झाला आहे, याबाबत सेवा फाउंडेशनचे चंद्रकांत असवले यांनी माहितीच्या आधाराखाली माहिती मागवली असता, कोणताही निधी मंजूर नसल्याचे बांधकाम खात्याने कळविले आहे. या पुलावर रात्री अंधार असतो. त्यामुळे अपघात होऊन मोठी दुर्घटना घडू शकतो. त्यासाठी पुलावर पथदिवे बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.