‘जीएसटी’मुळे गणवेशाची प्रतीक्षा
By admin | Published: July 17, 2017 04:02 AM2017-07-17T04:02:08+5:302017-07-17T04:02:08+5:30
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळा सुरू होऊन एक महिना झाला असताना बोर्डाच्या सर्व शाळांतील दीड हजार विद्यार्थ्यांना अद्याप
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळा सुरू होऊन एक महिना झाला असताना बोर्डाच्या सर्व शाळांतील दीड हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नसल्याची माहिती मिळाली आहे. जीएसटीमुळे गणवेश मिळण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे .
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व शिक्षा अभियान मोहिमेंतर्गत पहिली ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या सर्व मुली, पहिली ते आठवीत शिकणारे अनुसूचित जाती व जमातीतील सर्व मुले यांना दर वर्षी दोन गणवेश देण्यासाठी बोर्डाच्या संबंधित शाळांकडे निधी येत असतो. मात्र, या वर्षीपासून दोन गणवेशाची
रक्कम राज्य सरकार संबंधित विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे गणवेशाचा निधी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या खात्यावर अद्याप जमा झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कॅन्टोन्मेंटच्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या उद्देशाने बोर्ड प्रशासन दर वर्षी राज्य शासनाकडून येणाऱ्या निधी व स्वत:च्या निधीतून उर्वरित खर्च करून सर्व प्राथमिक शाळांत व महात्मा गांधी विद्यालयात शिकणाऱ्या सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना दोन गणवेश देते. या वर्षीही सर्व प्राथमिक शाळा, एक विद्यालय व बालवाडीतील सुमारे १५०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्याचे नियोजन करून नाशिक येथील एका कंत्राटदारास उन्हाळ्याच्या सुटीत गणवेश पुरवठ्याचे आदेश दिले होते.