अप्पर आयुक्तांची प्रतीक्षा, दोन महिन्यांपासून कार्यालय रिकामेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 01:28 AM2017-11-23T01:28:15+5:302017-11-23T01:28:34+5:30
उद्योगनगरीतील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी पिंपरी-चिंचवडला स्थलांतरित करण्याचा आदेश दिला.
पिंपरी : शहराच्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. प्रस्तावावरील पुढील कारवाईची प्रतीक्षा न करता, उद्योगनगरीतील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी पिंपरी-चिंचवडला स्थलांतरित करण्याचा आदेश दिला.
चिंचवड येथील परिमंडल तीनच्या उपायुक्त कार्यालयात अपर पोलीस आयुक्तांसाठी कक्ष तयार करण्यात आला. या इमारतीतून सहायक पोलीस आयुक्त राम मांडूरके यांचे कार्यालय भोसरीत स्थलांतरित केले. अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे चिंचवडच्या कार्यालयात येतील, अशी प्रतीक्षा केली जात असताना, त्यांची बदली सीआयडीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी झाली. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी येण्याची प्रतिक्षा कायम आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढू लागल्याने शासनाकडे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी विविध स्तरावरून गेल्या अडीच वर्षांपासून पाठपुरावा होत आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, त्यावर पुढील हालचाली न झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचे कार्यालय स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला. उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांचे चतु:श्रृंगीतील कार्यालय पिंपरीत स्थलांतरित करायचे. जेणेकरून वरिष्ठ दर्जाचे अधिकारी पिंपरी-चिंचवडला उपलब्ध होऊ शकतील, असा पर्याय पुढे आला. पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी जागेची पाहणी केली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत उत्तर प्रादेशिक विभाग आणि दक्षिण प्रादेशिक विभाग अशी प्रशासकीय कामकाजासाठी विभागणी केलेली आहे. दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांचे कार्यालय कोथरूडला स्थलांतरित करण्यात आले. त्याच धर्तीवर बदल करून उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांचे कार्यालय पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित करण्याचे निश्चित झाले. नागरिकांना तातडीक मदत मिळावी, या उद्देशाने स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुविधाही उपलब्ध करून देण्याचे नियोजन झाले. त्या दृष्टीने घाईघाईत प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
>सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाचे स्थलांतर
पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड येथे परिमंडल तीनचे उपायुक्त कार्यालय आहे. त्या इमारतीत उपायुक्त गणेश शिंदे यांचे कार्यालय खालच्या मजल्यावर आहे. त्याच इमारतीत सहायक पोलीस आयुक्त राम मांडूरके यांचे कार्यालय होते. मात्र, अपर पोलीस आयुक्त शिंदे यांच्यासाठी कार्यालय उपलब्ध व्हावे, याकरिता सहायक पोलीस आयुक्त मांडूरके यांचे कार्यालय भोसरीत स्थलांतरित झाले.
चिंचवड येथील कार्यालयात अपर पोलीस आयुक्त शिंदे रुजू होतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती. पोलीस आयुक्त शुक्ला यांनी सप्टेंबरमध्ये आदेश दिल्यानंतर प्रशासकीय सुविधा उपलब्ध झाल्या. काही बदलही झाले़ मात्र अतिरिक्त पोलीस आयुक्त शिंदे या कार्यालयास अद्यापपर्यंत वेळ देऊ शकले नाहीत. मागील आठवड्यात त्यांची सीआयडीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाल्याने नागरिकांची आशा मावळली. त्यांच्याऐवजी अन्य कोणी वरिष्ठ अधिकारी पिंपरी-चिंचवडसाठी उपलब्ध होऊ शकेल का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. खून, खंडणी, अपहरण, टोळीयुद्ध अशा गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडू लागल्याने पुन्हा स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे, या मागणीचा जोर वाढला आहे.