वाकड पोलिसांची कामगिरी लाखात भारी; २० लाखांचे १२० मोबाइल नागरिकांना परत
By नारायण बडगुजर | Updated: December 21, 2024 19:59 IST2024-12-21T19:53:39+5:302024-12-21T19:59:09+5:30
विशेष पथकाने ट्रेस केले हरवलेले, गहाळ, चोरी झालेले मोबाईल फोन

वाकड पोलिसांची कामगिरी लाखात भारी; २० लाखांचे १२० मोबाइल नागरिकांना परत
पिंपरी : मोबाईल हरवला, चोरी झाला अथवा गहाळ होताच संबधित व्यक्ती पोलिस ठाण्यात धाव घेतात. अशा गहाळ, चोरी झालेल्या मोबाईल फोनचा राज्यातून तसेच परराज्यातून वाकड पोलिसांनी शोध घेतला. असे २० लाखांचे १२० मोबाइल फोन नागरिकांना परत मिळवून दिले. त्यामुळे संबंधित नागरिकांचे चेहरे आनंदाने खुलले. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
वाकड पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २१) नागरिकांना मुद्देमाल परत देण्यात आला. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतून मोबाईल फोन चोरी, हरवणे तसेच गहाळ होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष मोहीम राबवून अशा फोनचा शोध घेण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, वाकड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मागदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी पोलिस अंमलदार शहाजी धायगुडे, कोंतेय खराडे, प्रमोद गायके यांचे विशेष पथक स्थापन केले. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (सीईआयआर) या पोर्टलव्दारे चोरी, हरवलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल फोन या विशेष पथकाने ट्रेस केले.
परराज्यातून आणले मोबाईल हरवलेले, गहाळ व चोरी झालेले मोबाईल हे पिंपरी-चिंचवडसह राज्यातील वेगवेगळे जिल्हे तसेच बिहार, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, आंधप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश येथे ट्रेस झाले. संबंधित मोबाईल ज्या व्यक्तींच्या ताब्यात आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मोबाईल परत करण्याबाबत सांगितले. प्रसंगी कायद्याचा धाक दाखवून मोबाईल परत मागविले. काही मोबाईल पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन हस्तगत केले.
मागील दोन महिन्यांमध्ये वाकड पोलिस ठाण्याकडून २० लाख रुपये किमतीचे १२० मोबाईल हस्तगत करण्यात आले. यापुढेही अशीच मोहीम राबवून नागरिकांचे गहाळ, चोरी झालेले मोबाईल परत करण्याची कार्यवाही चालू राहील. - विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ३