भजनात वारकरी झाले दंग
By Admin | Published: March 23, 2017 04:17 AM2017-03-23T04:17:19+5:302017-03-23T04:17:19+5:30
स्वानंद सुखनिवासी सद्गुरु विष्णू नरहरी जोगमहाराज यांनी संस्थापित केलेल्या श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेला
पिंपरी : स्वानंद सुखनिवासी सद्गुरु विष्णू नरहरी जोगमहाराज यांनी संस्थापित केलेल्या श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेला गुढीपाडव्याला १०० वर्षे पूर्ण होत असून, बुधवारपासून (दि. २२) शताब्दीपूर्ती महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू झाला असून, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, गाथा भजन, हरिकीर्तन, श्रीराम कथा, वारकरी संगीत भजनाच्या कार्यक्रमात वारकरी व भाविक दंग झाल्याचे चित्र दिसत आहे. शताब्दी सोहळा डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी वारकरी आतुर दिसत होते.
वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी पूर्ती महोत्सवानिमित्त संस्थेच्या नवीन इमारत परिसरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाला बुधवारी सकाळी दीपप्रज्वलन करून सुरुवात झाली. या वेळी रघुनाथजी महाराज देवबाप्पा, मारोतीबाबा कुऱ्हेकर, महापौर नितीन काळजे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, संस्थेचे अध्यक्ष संदीपानमहाराज शिंदे, संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, कीर्तनकार, प्रवचनकार आदी उपस्थित होते.
शताब्दी महोत्सवातील सर्वच कार्यक्रमांना वारकरी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पारायणाला बसलेल्या भाविकांची संख्याही मोठी आहे. संस्थेच्या वतीने वारकरी व भाविकांच्या मदतीसाठी व मार्गदर्शनासाठी सर्व परिसरात संस्थेचे स्वयंसेवक नेमलेले आहेत. आळंदी-चाकण रस्ता परिसरात विविध ठिकाणी संत साहित्यावर आधारित पुस्तके, गाथा आदीची विक्री करणारी खासगी दुकाने थाटण्यात आली आहेत. (वार्ताहर)